'मोदींच्या मनमानीविरुद्ध..', 'सत्तेतले नक्षलवादी' म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Uddhav Thackeray Group: मोदींचा पराभव व्हायला हवा ही जर स्वयंसेवी संस्थांची भूमिका असेल तर त्यात त्यांचे काय चुकले? असा सवाल उद्धव ठाकरे गटाने शहरी नक्षवलवाद या विषयासंदर्भात बोलताना उपस्थित केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 18, 2024, 12:09 PM IST
'मोदींच्या मनमानीविरुद्ध..', 'सत्तेतले नक्षलवादी' म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका title=
ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Uddhav Thackeray Group: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं आहे. मुख्यमंत्री शिंदेंबरोबरच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत ठाकरे गटाने लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन देणे म्हणजे नक्षलवाद आहे का? असा प्रश्न विचारला आहे. राज्यातील काही स्वयंसेवी संस्था म्हणजेच एनजीओ या शहरी नक्षलवाद पोसत असून या शहरी नक्षलवाद्यांनी पंतप्रधान मोदी यांना हटविण्यासाठी काम केले, या मुख्यमंत्री शिंदेंच्या विधानासंदर्भ देत ठाकरे गटाने ही टीका केली आहे.

शिंदेंचं बोलणं असंबंध

"घटनाबाह्य मुख्यमंत्री मिंधे महोदय हे पूर्णपणे भाजपची भाषा बोलू लागले आहेत यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. भाजपने शिंदे यांना नकली शिवसेनेचे खेळणे दिले आहे. त्याच्याशी खेळत मिंधे मुख्यमंत्री भाजपच्या सुरात सूर लावतात. राज्यातील काही स्वयंसेवी संस्था म्हणजेच एनजीओ या शहरी नक्षलवाद पोसत असून या शहरी नक्षलवाद्यांनी पंतप्रधान मोदी यांना हटविण्यासाठी काम केले, असे मुख्यमंत्री मिंधे यांनी सांगितले. एनजीओंनी मोदींविरोधात प्रचार केला असे मिंधे म्हणतात. तरीही मोदी पंतप्रधान झालेच याचा आनंद मिंधे यांना झाला. मिंधे यांचे बोलणे असंबद्ध आहे," अशी भूमिका 'सामना'मधून मांडण्यात आली आहे.

खोकेशाहीविरुद्ध बोलणाऱ्यांनाही शहरी नक्षलवादी ठरवणार की काय?

"शहरी नक्षलवाद ही संकल्पना काही काळापूर्वी भाजपच्याच सुपीक डोक्यातून बाहेर पडली. नक्षलवाद देशाच्या काही दुर्गम भागात आहेच. पण शहरातील काही सुशिक्षितांमध्येही नक्षलवाद शिरला हा प्रचार भाजपने सुरू केला. मुख्यमंत्री मिंधे तेच करत आहेत. मोदी यांची हुकूमशाही, लोकशाहीविरुद्ध कृत्य, अमित शहा यांचा दहशती कारभार यावर शहरातील सुशिक्षितांनी प्रश्न विचारले की त्यांच्यावर शहरी नक्षलवादाचा शिक्का मारून बदनाम करायचे, हे धोरण गेल्या दहा वर्षांपासून राबवले जात आहे. जे मोदींच्या मनमानीविरुद्ध प्रचार करतात त्यांना नक्षलवादी ठरवण्याचे तंत्र भाजपने सुरू केले. आता मिंधे व त्यांच्या लोकांच्या खोकेशाहीविरुद्ध बोलणाऱ्यांनाही शहरी नक्षलवादी ठरवणार की काय?" असा प्रश्न ठाकरे गटाने 'सत्तेतले नक्षलवादी' या लेखातून विचारला आहे.

नक्की वाचा >> मोदी-मेलोनी Memes वरुन ठाकरे गटाचा संताप; म्हणाले, 'यावरुन देशातील...'

नक्षलवादाचे भूत भाजपाच्या मानगुटीवर

"शहरी नक्षलवादाचा बागुलबुवा सरकारी यंत्रणांकडून उभा केला जातो. लोकसभा निवडणुकांच्या आधी महाराष्ट्रातील पाच प्रमुख शहरांमध्ये हिंसक घटना घडवण्याचा नक्षलवाद्यांचा कट असल्याचे वारंवार सांगितले गेले. सरकारविरोधात असंतोष निर्माण करण्यासाठी घातपात घडवले जातील, असे पोलिसांतर्फे सांगितले. प्रत्यक्षात महाराष्ट्रातील निवडणुका सुरळीत पार पडल्या व जो काही गोंधळ घातला तो पोलिसांनी व सत्ताधाऱ्यांनी. त्यामुळे शहरी नक्षलवादाचे भूत जर कुणाच्या मानगुटीवर बसले असेल तर ते भाजपच्या," असा खोचक टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

हक्कांची जाणीव करुन देणे गुन्हा आहे का?

"आनंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज, फादर स्टेन स्वामी अशा काही सुशिक्षितांना अटक करून त्यांच्यावर सरकार उलथवण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवला व वर्षानुवर्षे तुरुंगात ठेवले. पुण्यातल्या ‘एल्गार’ परिषदेच्या निमित्ताने पोलिसांनी ही कारवाई केली. सरकारी यंत्रणेविरुद्ध आवाज उठवण्याचे स्वातंत्र्य ब्रिटिश काळात भारतीय जनतेस होते, पण आता असे करणाऱ्यांना स्वतंत्र भारतात राजद्रोही ठरवले जाते. शहरी नक्षलवाद्यांनी मोदींविरुद्ध प्रचार केला म्हणजे काय केले? मोदी व त्यांचे लोक 400 जागा जिंकून देशाचे संविधान बदलणार आहेत. त्यामुळे मोदींचा पराभव व्हायला हवा ही जर स्वयंसेवी संस्थांची भूमिका असेल तर त्यात त्यांचे काय चुकले? आदिवासी पाड्यांवर, जंगलात बऱ्याच स्वयंसेवी संस्था काम करतात. आदिवासींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देतात, लढण्याचे बळ देतात. असे करणे हा गुन्हा आहे काय?" असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

नक्की वाचा >> 'मोदी-शाह आता हे 4 पक्ष फोडणार', राऊतांनी घेतली पक्षांची नावे; म्हणाले, 'इंडिया आघाडी..'

असा विश्वास मोदी, शहा, फडणवीस, शिंदेंना आहे का?

"झारखंडच्या जंगलात पोलिसी अत्याचारांविरुद्ध तेथील आदिवासींचे नेतृत्व करणाऱ्या रूपेश कुमार सिंग या पत्रकारास शहरी नक्षलवादी ठरवून चार वर्षांपासून तुरुंगात डांबले आहे. हे सर्व लोक डाव्या विचारांचे असू शकतात, पण डाव्यांनी अनेक राज्यांत लोकशाही मार्गाने निवडणुका लढवून राज्ये जिंकली आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे हे सर्व विद्यार्थी संघटनांचे लोक नक्षलवादी असल्याचे आरोप भाजपकडून होत असतात. हाच आरोप कन्हैया कुमारवर झाला, पण कन्हैया कुमार संविधानाचा रक्षक म्हणून लोकशाही मार्गाने निवडणूक प्रक्रियेत उतरला. म्हणजे लोकशाही व्यवस्थेवर त्याचा विश्वास आहे. असा विश्वास मोदी, शहा, फडणवीस, मिंधे वगैरे लोकांचा आहे काय?" असंही ठाकरे गटाने विचारलं आहे.

हासुद्धा शहरी नक्षलवादाचाच भाग

लेखाच्या शेवटी भाजपावर निशाणा साधत भाजपा करत असलेल्या गोष्टी सुद्धा शहरी नक्षलवादाचाच भाग असल्याची टीका करण्यात आली आहे. "सुप्रीम कोर्टाचे निर्देश हे घटनाबाह्य सरकारविरोधी असतानाही या मिंधे सरकारला जबरदस्तीने जनतेच्या छाताडावर बसवणे या अतिरेकी कृतीलाच शहरी नक्षलवाद म्हणावे लागेल. मोदी-शहांची तपास यंत्रणा राजकीय विरोधकांना धमक्या देऊन खंडण्या गोळा करते व पक्षांतरे करायला लावते हासुद्धा शहरी नक्षलवादाचाच भाग आहे. राज्यात सत्ता उलथवण्याचा कट या लोकांनी केला. पण मोदी यांची एकाधिकारशाही जनतेने मतपेटीतून उलथवली. यात नक्षलवादाचा विषय येतो कोठे? छत्तीसगड, झारखंड, आंध्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत नक्षलवाद आहे, पण हा नक्षलवाद सामाजिक-आर्थिक विषमता, बेरोजगारी व पोलिसी अत्याचारांतून उगम पावला. मोदी, शहा, फडणवीस यांनी सरकारी यंत्रणेचा वापर करून निर्माण केलेला दहशतवाद व नक्षलवाद यात मोठा फरक नाही," असा टोला लेखाच्या शेवटी लगावण्यात आला आहे.