Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather News : देशात सरासरीपेक्षा 20 टक्के कमी पाऊस, तर राज्याच्याही बहुतांश भागांना मान्सूनची प्रतीक्षा. पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान...  

सायली पाटील | Updated: Jun 18, 2024, 08:24 AM IST
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं  title=
Maharashtra Weather News monsoon shows no signs in mumbai konkan wahsed out by rain latest rain updates

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशात हजेरी लावल्यानंतर दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्राचा काही भाग वगळता उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र या वरुणराजानं पाठ फिरवल्य़ाचं पाहायला मिळालं. पहिल्या आठवड्यात कोसळणारा हा मान्सून दुसऱ्या आठवड्यात मात्र महाराष्ट्रातही माघार घेताना दिसला, ज्यामुळं आता शेतकरी वर्गासह हवामान विभागानंही चिंतेचा सूर आळवला आहे. 

राज्याच्या दिशेनं येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर ओसरल्यामुळं पावसानं मोठी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं कोकण, मुंबई, पुणे या भागांमध्ये काहीशी तापमानवाढ नोंदवण्यात आली आहे. पुढील 24 तासांत मात्र इथल्या उकाड्यापासून दिलासा मिळणार असल्याचे संकेत देत याच भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सातारा , सांगली आणि कोकणामध्ये पावसाची समाधानकारक हजेरी असू शकते, तर मुंबईकरांची प्रतीक्षा मात्र वाढताना दिसणार असून मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, ठाणे, मुंबईत हवामान खात्याचा ग्रीन अलर्ट लागू आहे. 

हेसुद्धा वाचा : आइस्क्रीममध्ये मानवी बोट, किडा! आता, एअरइंडियाच्या जेवणात आढळली 'ही' धोकादायक वस्तू... प्रवाशाचा जीव वाचला

यंदाच्या वर्षी मान्सूननं पहिल्या टप्प्यात मराठवाड्यासह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मजल मारली. तर, तिथं विदर्भात अमरावती आणि चंद्रपूर गाठलं. त्यानंतर मात्र मान्सूननं राज्यात समाधानकारक कामगिरी केली नसल्यामुळं सातत्यानं होणाऱ्या हवामान बदलांचा फटका शेतीच्या कामांवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये साथीचे आजार वाढले असून, क्षणात उकाडा आणि क्षणात पाऊस ही परिस्थिती अडचणी निर्माण करताना दिसत आहे. 

गेल्या 24 तासांची पावसाचा आढावा 

सोलापुरात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार पावसाला सुरुवात झाली. उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागाला पावसाने चांगलच झोडून काढलं. अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसामुळे शेतात पाणीच पाणी साचलं. पुढील चार दिवस जिल्ह्यात दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  नागपूर शहरातही सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडासह शहरात पाऊस झाला. पावसामुळे प्रचंड उकड्यापासून नागपूरकरांना थोडा दिलासा मिळाला खरा पण, हा मान्सूनचा पाऊस नसल्याचं प्रादेशिक हवामान विभागाने स्पष्ट केलं. 

तिथं कोकणात रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. तिवरे गावात धरणखोरे परिसरात हा तुफान पाऊस झाला. या पावसामुळे आजुबाजूचे नदी, नाले तुडुंब भरून वाहतायेत. मुसळधार पाऊस झाल्यानंतर येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जीव मुठीत घेऊन राहतात.