'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया' पण इथे तर साधा रस्ताही नाही? शहापूरमधलं भयाण वास्तव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील शाहापूर तालुक्यात अनेक आदिवासी पाड्यांवर रस्ते, वीज या मुलभूत सुविधाही नसल्याचं भयाण वास्तव समोर आलं आहे. विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून दररोज शाळेत जावं लागतं. 

चंद्रशेखर भुयार | Updated: Jul 15, 2023, 05:08 PM IST
'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया' पण इथे तर साधा रस्ताही नाही? शहापूरमधलं भयाण वास्तव title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, शाहापूर : ठाणे जिल्ह्याला (Thane District) पहिला मुख्यमंत्री मिळाला मात्र आजही बहुतांश गाव पाड्यात जाण्यासाठी रस्त्यांची सोय नाहीये. आदिवासी (Tribal) तालुका असणाऱ्या शहापूर तालुक्यातील (Shahapur) पिवळीपाडा-हेदूचापाडा या ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या गावकऱ्यांना तसंच विद्यार्थ्यांना (Student) रस्ताच नसल्याने जीव धोक्यात घालून कमकुवत अश्या लाकडी साकव वरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात नाल्याला जेव्हा पूर येतो तेंव्हा हा प्रवास अतिशय धोकादायक ठरतो

हेदुचापाडा या 110 आदिवासी  लोकसंख्या असलेल्या पाड्यात आजही रस्ता, विज नाही. इथल्या ग्रामस्थांना, महिलांना देखील बाजार तसंच रूग्णालयात जाण्यासाठी नाल्यावर पूल नसल्यामुळे याच लाकडी साकावाचा वापर करावा लागतो आहे. साकाव बांधण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे लेखी मागणी करुन देखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचं नागरिकांची म्हणणं आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात सुमारे 63 आदिवासी गाव पाड्यांना येण्याजाण्या साठी रस्ता नाही त्यामुळे पावसाळ्यात या आदिवासी पाड्यांचा शहराशी संपर्क तुटतो. श्रमजीवी संघटनेचे शहापूर तालुका सचिव प्रकाश खोडका यांनी सांगितले की, प्रशासन आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने रस्त्यांअभावी अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रस्त्याच्या मागणीसाठी अनेक वेळा आदिवासींनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढले आहेत, पण यानंतरही ठोस कारवाई झालेली नाही.

देशभरात 75 वा अमृत मोहत्सव साजरा होत असतांना मुंबईच्या जवळ असणाऱ्या शहापूर तालुक्यातील अनेक आदिवासी गावांना पाड्यावर जाण्यासाठी रस्ते नाहीत. ग्रामपंचायत सोली पाडा - हेदुचापाडा इथं जाण्यासाठी रस्ता नसून गावात अजूनही वीजपुरवठा नसल्याने ग्रामस्थांना मूलभूत सुविधांविना जगावं लागत आहे. या गावात 19 कुटुंबांची घरे आहेत. शिक्षणासाठी या गावातील 23 मुले-मुली रोज आपला जीव धोक्यात घालून नदीवर बाधंलेल्या लाकडी पुलावरुन प्रवास करत आहेत. 

तळागाळातील मुलांना शिक्षण मिळावं यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. 'पडेगा इंडिया तो बढेगा इंडिया' असा नारा देण्यात येतो. पण प्रत्यक्षात या सर्व योजना केवळ कागदावरच आहेत. खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत त्या पोहोचत नाहीत हे वास्तव आहे.आपल्या देशात स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष साजरा केलं जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक गावं आजही मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत. अनेक योजना या गावांपर्यंत पोहोचल्याच नाहीएत.  सुस्त प्रशासन आणि फक्त राजकारणात रमलेले लोकप्रतिनीधी यांच्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय