...अन्यथा मद्यविक्रीची परवानगी रद्द, पोलिसांनी दिलीये तंबी

थर्टीफर्स्टला मद्यविक्री करणा-या बारमालकांना ग्राहकांच्या वाहनांसाठी चालकाची व्यवस्था करावी आणि त्यांना सुखरूप घरी सोडावे अन्यथा मद्यविक्री करू नये, अशी तंबी ठाणे पोलिसांनी दिलीय. पोलिसांच्या या तंबीवर हॉटेलमालकांनी अभिनव उपाय शोधून काढलाय. 

Updated: Dec 30, 2017, 11:35 AM IST
...अन्यथा मद्यविक्रीची परवानगी रद्द, पोलिसांनी दिलीये तंबी title=

कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई : थर्टीफर्स्टला मद्यविक्री करणा-या बारमालकांना ग्राहकांच्या वाहनांसाठी चालकाची व्यवस्था करावी आणि त्यांना सुखरूप घरी सोडावे अन्यथा मद्यविक्री करू नये, अशी तंबी ठाणे पोलिसांनी दिलीय. पोलिसांच्या या तंबीवर हॉटेलमालकांनी अभिनव उपाय शोधून काढलाय. 

नववर्ष स्वागताच्या निमित्तानं थर्टी फस्टच्या रात्री अनेक ठिकाणी करमणूक कार्यक्रम तसंच मेजवान्याचं आयोजन केलं जातं. अशा पार्ट्यांना हजेरी लावणारे तळीराम दारुच्या नशेत गाडी चालवून अपघाताला कारणीभूत ठरतात. त्यामुळे दारु पिऊन गाडी चालवणा-याच्याही जिवावरही बेतू शकते. 

या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी काही कडक पावलं उचलली आहेत.  करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करून त्यामध्ये मद्य पुरवणा-या हॉटेल आणि बार व्यावसायिकांना नोटीसा पाठवण्यात आल्यात. पार्टी आयोजित करताना निमंत्रितांना अथवा त्यात सहभागी होणा-या मद्यपी वाहनचालकांना घरी पोहोचवण्यासाठी वाहनचालकांची व्यवस्था करा,  अन्यथा मद्यविक्रिची परवानगी नाकरण्यात येईल अशी तंबीच पोलिसांनी बार आणि हॉटेल मालकांना नोटीसीद्वारे दिलीय.

पोलिसांच्या या तंबीनंतर हॉटेल आणि बार मालकांनीही कायद्याची चौकट राखून टल्ली होणा-यांसाठी खास घरपोहच वाहनांची व्यवस्था केलीय. तशी स्किमच हॉटेल मालकांनी आपल्या न्यू ईयर पार्टीच्या आमंत्रण पत्रिकेवर छापलीय.  त्यामुळे कायदाही पाळला गेलाय.

शहरांमधील विविध सर्वच नाक्यानाक्यांवर वाहतूक पोलिसांचे पथक फिरणार आहे. याशिवाय, येऊरच्या परिसरात होणा-या विनापरवाना पार्ट्यांवरही  पोलिसांची करडी नजर राहणार आहे. येऊरच्या पायथ्याशी वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी केलीय. तसंच येऊरमधील बंगला धारक आणि हॉटेल मालकांना लाऊड स्पीकर, डीजे लावण्यास बंदी असल्याचे निदर्शनास आणून दिलंय.