नागपूर : लालबागच्या राजाची (lalbaugcha raja 2021) प्रतिष्ठापना झालीय. मंडपात राजा विराजमान झालाय.. शेषनागावर विराजमान असं यंदाचं बाप्पाचं रुप आहे. प्रत्यक्ष मंडपात भाविकांना दर्शन दिलं जाणार नाही. त्याआधी लालबागमध्ये पोलिसांची अति सुरक्षा असल्यामुळे दुकानदार आणि स्थानिक त्रस्त झालेत. यामुळे तब्बल 2 तास प्रतिष्ठापनेला उशीर झाला. अखेर पोलिस आणि मंडळ पदाधिकाऱ्यांच्या चर्चेनं वाद मिटला.
मात्र त्यानंतर वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलिसांनी मारहाण केली. सकाळी लालबागचा राजा मंडळ आणि मुंबई पोलीस यांच्यात वाद झाला होता. यासंदर्भातल्या बातम्यांसाठी तिथे पोहोचलेल्या माध्यम प्रतिनिधींवरच पोलिसांनी राग काढला. अधिकृत पास असतानाही पोलिसांनी पत्रकारांना धक्काबुक्की करत परिसरातून बाहेर जाण्यास सांगितलं.
या प्रकारावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पत्रकार त्यांचं काम नियमांचं पालन करुन करत होते, त्यांच्याकडे पासही होते, अशावेळी त्यांना मारहाण, धक्काबुक्की करणं योग्य नाही. माध्यमांवर दबाव निर्माण करण्याचं काम हे सरकार करत आहे. इतकी दंडुकेशाही योग्य नाही. याची दखल सरकारने घेतली पाहिजे. कारवाई तर झालीच पाहिजे पण अशाप्रकारे दंडुकेशाहीच्या जोरावर जर आपण कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा मारत असू तर ते काही योग्य नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हे सरकार माध्यमांवर दबाव टाकत आहे, माध्यमांवर गुन्हे दाखल होत आहेत, अशा घटना म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याण्याचे प्रकार असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.