महानगरपालिका आणि नगरपरिषदेतील नगरसेवकांची संख्या वाढली

आगामी निवडणुकीत महानगरपालिका आणि नगरपरिषदांमधील नगसेवकांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे.

Updated: Oct 27, 2021, 09:37 PM IST
महानगरपालिका आणि नगरपरिषदेतील नगरसेवकांची संख्या वाढली

मुंबई : आगामी निवडणुकीत महानगरपालिका आणि नगरपरिषदांमधील नगसेवकांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. वाढलेली लोकसंख्या तसेच विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

सध्या महानगरपालिकांमधील नगरसेवकांची किमान संख्या 65 तर कमाल संख्या 175 इतकी आहे. तर नगरपरिषदेत किमान संख्या 17 तर कमाल संख्या 65 आहे. लोकसंख्या आणि वस्ती वाढत असल्याने नगरसेवकांची संख्या ही वाढणार आहे.

कोल्हापुरात नगरसेवकांची संख्या 81 वरुन 92 झाली आहे. नवी मुंबईत नगरसेवकांची संख्या 111 वरुन 122, औरंगाबादमध्ये 115 वरुन 126, वसई-विरारमध्ये 115 वरुन 126, नाशिकमध्ये 122 वरुन 133, कल्याण-डोंबिवलीमध्ये 122 वरुन 133, पिंपरी-चिंचवडमध्ये 128 वरुन 139, ठाण्यात 131 वरुन 142, पुण्यात 162 वरुन 173 नगरसेवकांची संख्या वाढली आहे.