सोनियांना भेटण्याआधी शरद पवारांची राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांशी चर्चा

आज राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक...

Updated: Nov 17, 2019, 09:03 AM IST
सोनियांना भेटण्याआधी शरद पवारांची राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांशी चर्चा  title=
संग्रहित फोटो

मुंबई : सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेगळं वळण लागलं आहे. याच राजकीय हालचाली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यात सरकार स्थापनेची पुढील रणनीती ठरवण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक आज सायंकाळी ४ वाजता पुण्यात पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर चर्चा करण्यासाठी पक्षाच्या २१ सदस्यीयांची बैठक शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे.

शरद पवार राजकीय कोंडी दूर करण्यासाठी काही रणनितींवर चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचं मलिक यांनी सांगितलं. तसंच मंगळवारपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांमध्ये  बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत महाराष्ट्रातात सरकार स्थापनेसाठी कॉंग्रेसचा सहभाग असेल की नाही याबाबत चर्चा होण्याची शक्यता असल्याचंही मलिक यांनी सांगतिलं.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अजून संपलेला नाही. राज्यात सत्ता स्थापनेच्या दृष्टीने शिवमहाआघाडीची तयारी सुरु आहे. या आघाडीची पहिली बैठक झाली. त्यामुळे राज्यात पहिले पाऊल पुढे पडले आहे. याबैठकीनंतर राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी अत्यंत महत्वाची असलेली काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नियोजित बैठक रद्द झाली. दोन्ही नेते रविवारी भेटणार होते. ही भेट पुढे ढकलण्यात आली असून ती सोमवारी होणार आहे.

  

१२ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू आहे. महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष असून त्यांच्याकडे १०५ आमदार आहेत. पण भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून महाशिवआघाडी उदयाला आली आहे. शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीकडे ५४ तर काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत.