Travel News : आठवड्याच्या शेवटी कामाच्या व्यापातून वेळ काढत तुम्ही भटकंतीसाठी काही नवे पर्याय शोधताय का? कंधारचा किल्ला तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. प्रकाशझोतात असणाऱ्या किल्ल्यांच्या वाटांना न जाता एकदा या कंधारच्या किल्ल्याच्या दिशेनंही या. इथं असणारे अवशेष पाहून तुम्हीही भारावून जाल.
चौथ्या शतकात काकतीय घराण्यानं कंधार किल्ल्याची निर्मिती केली अशी माहिती उपलब्ध आहे. ही राष्ट्रकुटांचीही राजधानी होती. त्यांच्यामार्फत तयार करण्यात आलेला जगत्तुंग समुद्र हा महाराष्ट्रातील एक प्राचीन पाणीसाठा आहे. राष्ट्रकुटांच्या अधिपत्त्याखाली असताना कृष्णदुर्ग अशी या किल्ल्याची ओळख.
कंधार शहरापासून हा भुईकोट किल्ला 4 किमी अंतरावर आहे. किल्ल्याला संरक्षणार्थ दुहेरी तटबंदी आहेत. ज्यात बाहेरील तटबंदी 40 तर आतील 60 फूट उंचीची आहे.
किल्ल्यातील महाकाली / धन बुरुजात एक वास्तू दिसते. या वास्तूत एक भुयार आहे. ही वास्तू तिजोरी किंवा जवाहिरखाना म्हणून वापरण्यात येत होती असं सांगण्यात येतं. त्यावरूनच महालकाली बुरुजाला धन बुरुज असे नाव नंतरच्या काळात पडले असावे. या वास्तूच्या समोरच्या बाजूस मशिदेचे उत्तराभिमुख प्रवेशद्वार आहे. ते ओलांडून आपण मशिदीपाशी पोहोचतो. काकतीय राजा सोमदेव आणि महादेव यांनी याठिकाणी शिवमंदिर बांधले होते. ते पाडून निजामाच्या काळात मशिद बांधण्यात आली.
शिवमंदिराचे पूर्वाभिमुख प्रवेशव्दार बुझवून त्याठिकाणी उत्तराभिमुख प्रवेशव्दार बांधण्यात आले. पूर्वाभिमुख प्रवेशव्दार बुझवलं तरी त्याच्या दोन्ही बाजूना असलेली नागशिल्प आणि आजही स्पष्ट पाहायला मिळतात. मशिदीच्या इमारतीची लांबी 50 फूट आणि रूंदी 25 फूट आहे. या मशिदीवर तीन घुमट आहेत. चार फारसी लिपीतील शिलालेखही इथं आहेत. मशिदीच्या बाजूला चुन्याचा घाणा, जातं आणि शिवलिंग ठेवलेलं आहे. अंबरखाना आणि चांगल्या अवस्थेत असणारे बुरूज पाहताना तुमचा वेळ इथं कधी निघून जाईल लक्षातही येणार नाही.
मशिदीच्या बाजूने जाणार्या जिन्याने अंबरी बुरुजावर जाता येतं. निजामाचा सेनापती मलिक अंबरने या बुरुजाची फेरबांधणी केली. त्यामुळे हा किल्ल्यावरील सर्वात भव्य आणि मोठा बुरुज मलिक अंबरच्या नावाने ओळखला जातो. या बुरुजावर मकरमुख असलेली मोठी 15 फूट लांब बांगडी तोफ़ आहे. तोफेला दोन्ही बाजूला गोलाकार कड्या आहेत.
तुम्ही कंधारचा किल्ला पाहण्यासाठी येणार असाल तर एक संपूर्ण दिवस हाताशी ठेवून या. सध्या हा किल्ला पुरातत्वं खात्याच्या ताब्यात आहे. नांदेड हे इथून जवळचं शहर. रस्ते आणि रेल्वे मार्गानं नांदेडला येण्यासाठीच्या सोयी असल्यामुळं यात कोणतीही अडचण नाही. पुढे नांदेड ते कंधार तुम्हाला खासगी वाहन नसल्यास एसटीचा पर्याय उपलब्ध आहेच.