Suresh Dhas On Prajakta Mali: भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीसंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. यानंतर प्राजक्ता माळीने त्यांना जाहीर माफी मागण्याचे आवाहन केले. पण आपण माफी मागणार नसल्याचे सुरेश धस यांनी सांगितले होते. यावेळीच प्राजक्ता माळीने महिला आयोगात तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 105 शस्त्र परवाने रद्द झाले आहेत. उर्वरित प्रवण्याबाबत लवकरच पडताळणी होऊन कारवाई होणार आहे. कोणत्या पोलीस अधीक्षक यांच्या काळात अधिक शस्त्र परवाने दिले याचीही तपासणी होणार आहे.पुढच्या पंधरा दिवसात कारवाई झाली नाही तर त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.ज्या लोकप्रतींधिनी यासाठी शिफारशी दिल्या त्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी सुरेश धस यांनी केली.
परळीत शस्त्र परवाने जास्त आहेत त्यामागे त्यांचे आका आहेत.राखेचे धंदे करण्यासाठी हे परवाने लागतात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संपत्ती जप्त करण्याची कारवाई गतीने व्हायला हवी. मग त्यांच्यासोबत कोणाची प्रॉपर्टी आहे ते कळेल, असे सुरेश धस म्हणाले. यावेळी त्यांना प्राजक्ता माळीने महिला आयोगात केलेल्या तक्रारीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. चरित्र हनन केल्यासंदर्भातील तक्रार तुमच्याविरोधात झाली असल्याबद्दल त्यांना विचारले. पण त्यांनी तो टाळत, कृपया तो विषय संपला आहे. तुम्ही तो विषय बोलणार असाल...जे काही झालंय त्याला सामोरे जायला मी तयार आहे. मला फक्त संतोष देशमुख खून प्रकरणातील प्रश्न विचारा, असे ते म्हणाले. संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामध्ये झालेलं जंगलराज, संतोषचा झालेला अतिभयानक खून यावरुन लक्ष बाजूला करु नका, असे ते म्हणाले. या प्रकरणातील आरोपींची संपत्ती ही कोट्यवधीची आहे. त्यामुळे ती कार्यवाही गतीने व्हायला हवी.जोपर्यंत ठोस माहिती येत नाही तोपर्यंत मी बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
बावनकुळे हे माझे नेते आहेत. ते जे म्हणाले त्याप्रमाणे आम्ही कुठल्या बाबीत अडथळा आणणार नाही.कोणीही नेते माझ्या विरोधात बोलले नाहीत. काही लोक रोज शेकडो टिपर राख उपसा करतात. या बाबत मी पोलीस अधीक्षकांना माहिती देणार आहे. पर्यावरण खात्याने थर्मलमुळे होणाऱ्या प्रदूषण कडे लक्ष द्यावे, असे सुरेश धस म्हणाले.राज्याचे मुख्यमंत्री हेच पालकमंत्री हवे आहेत.ते आष्टी मतदार संघात एकदा आले होते. माझ्या मतदार संघातील गैरप्रकार बंद केले आहेत. मुख्यमंत्र्यांनीच बीडचे पालकमंत्री व्हावे, अशी विनंती आपण केल्याचेही सुरेश धस यांनी म्हटले.
प्राजक्ता माळी यांचा अर्ज मुंबई पोलीस, बीड पोलीस सायबर पोलिस यांना पाठवला आहे. यासंदर्भात पोलिसांनी आम्ही निर्देश दिले असल्याचे रुपाली चाकणकर म्हणाल्या. प्राजक्ता माळी हे निमित्त आहे पण सोशल मीडियामुळे अनेक गैरप्रकार घडतात. शनिवारी प्राजक्ता माळीची तक्रार आमच्याकडे आली. चारित्र्य हनन केले जात असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीसंदर्भात वक्तव्य केलं होतं. त्यानंतर केलेल्या बातम्या बदनाम करणाऱ्या आहेत असं तक्रारीत म्हटलं आहे.संबंधित पोलीस यंत्रणांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.