'विराट कोहली अजून 3-4 वर्षं खेळेल, पण रोहित शर्मा...', रवी शास्त्री यांचं मोठं विधान; 'त्याची हालचाल आता...'

भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या कसोटी क्रिकेटमधील भवितव्यावर भाष्य केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 30, 2024, 06:05 PM IST
'विराट कोहली अजून 3-4 वर्षं खेळेल, पण रोहित शर्मा...', रवी शास्त्री यांचं मोठं विधान; 'त्याची हालचाल आता...' title=

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) ब्रिस्बेन कसोटी सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा केली असता अनेकांनी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) संपेपर्यंत अजून काही जण निवृत्ती घेतील असा अंदाज वर्तवला होता. यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या नावाची चर्चा रंगली आहेत. दरम्यान या मालिकेत दोघंही चाचपडताना दिसत असल्याने अनेकजण तर शिक्कामोर्तब करत आहेत. असं झाल्यास क्रिकेटमधील एका सुवर्णकाळाचा अंत होईल. मेलबर्नमधील पराभवानंतर आता पुन्हा एकदा याची चर्चा रंगली आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी दोन्ही फलंदाजांच्या भवितव्यावर भाष्य केलं आहे. 

चौथ्या कसोटी सामन्यातही रोहित शर्मा अपयशी ठरला आहे. पाचव्या दिवशी भारताला जिंकण्यासाठी 340 धावांची गरज असताना रोहित शर्मा 40 चेंडूत फक्त 9 धावा करुन बाद झाला. रोहित शर्माने 5 डावांमध्ये 6.20 च्या सरासरीने फक्त 31 धावा केल्या आहेत. सप्टेंबर महिन्यापासून रोहित शर्मा एकही चांगली खेळी करु शकलेला नाही. तो फक्त 164 धावा करु शकला आहे. 

दुसरीकडे विराट कोहलीने पर्थमध्ये शतक ठोकत कमबॅक करण्याचे संकेत दिले होते. न्यूझीलंडविरोधातील मालिकेत विराट कोहली चांगली कामगिरी करु शकला नव्हता. ऑस्ट्रेलियाविरोधातील पाच डावांमध्ये त्याने 7, 11, 3, 36 आणि 5 धावा केल्या आहेत. 

भारतीय क्रिकेट संघाचे दोन्ही स्टार खेळाडू मैदानावर संघर्ष करताना दिसत असून, रवी शास्त्री यांनी मोठं विधान केलं आहे. विराट कोहलीमध्ये अद्यापही काही कसोटी करिअर शिल्लक आहे, मात्र रोहित शर्माची वेळ आता झाली आहे असं भाकित रवी शास्त्री यांनी केलं आहे. 

"मला वाटतं विराट कोहली अजून काही काळ खेळेल. जो ज्याप्रकारे बाद झाला किंवा इतर गोष्टी विसरुन जा. मला वाटतं तो अजून 3 ते 4 वर्षं खेळेल. पण रोहितबद्दल बोलायचं झाल्यास आता त्याची वेळ झाली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या पायांची हालचाल आधीसारखी नाही. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत असल्याने आता कदाचित मालिका संपल्यानंतर तो निर्णय घेईल," असं रवी शास्त्री म्हणाले आहेत.

विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल बोलायचं गेल्यास स्टम्पच्या बाहेर जाणारे चेंडू खेळताना त्याला संघर्ष करावा लागत आहे. सध्याच्या मालिकेत तो सहा ते सात वेळा अशा चेंडूवर बाद झाला आहे. "तो मॉडर्न ब्रॅडमॅन वाटत आहे. पण त्यांनाही स्टम्पच्या बाहेर जाणारे चेंडू खेळताना संघर्ष करावा लागायचा," असं इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मार्क निकोसने म्हटलं आहे. 

शास्त्री पुढे म्हणाले, "ऑस्ट्रेलियाने अथक प्रयत्न केले आहेत. त्यांनी त्याच्या संयमाची परीक्षा घेतली. तुम्हाला माहिती आहे kr, त्याने बरेच चेंडू सोडले. मला अजूनही वाटते की या कसोटी सामन्यात त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे, बाद वगळता, तो चांगला दिसत आहे. गोलंदाजी अत्यंत चांगली होती आणि चेंडू आत स्विंग करायला सुरुवात झाली आहे. एकदा स्टार्कने 140 किमी वेगाने स्विंग करायला सुरुवात केली की, उजव्या हाताच्या गोलंदाजांना  कठीण होते. पण बाद होण्याचा प्रकार जवळजवळ सारखाच दिसतो. ऑफ स्टंपच्या बाहेर फिरत्या कव्हर ड्राइव्हसाठी जाण्याचा मोह असतो. तुम्हाला माहिती आहे, तो, तो प्रतिकार करू शकला नाही. आणि भविष्यात तुम्हाला त्याबद्दल विचार करावा लागेल".