स्टेडियमच्या VIP गॅलरीमधून पडल्याने महिला आमदार गंभीर जखमी; 24 तासांपासून Ventilator वर

Women MLA Fall From Stadium VIP Gallery: गिनीज बुक ऑफ रेकॉर्डससंदर्भात आयोजित कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी महिला आमदार या ठिकाणी आली होती.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 30, 2024, 03:48 PM IST
स्टेडियमच्या VIP गॅलरीमधून पडल्याने महिला आमदार गंभीर जखमी; 24 तासांपासून Ventilator वर title=
कार्यक्रम सुरु असतानाच झाला अपघात (फोटो पीटीआय आणि सोशल मीडियावरुन साभार)

Women MLA Fall From Stadium VIP Gallery: कोच्चीमधील जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये आयोजित 'मृदंग नादम' नावाच्या कार्यक्रामध्ये थ्रिक्काकारा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार उमा थॉमस यांचा भीषण अपघात झाला. या कार्यक्रमासाठी हजेरी लावली असता त्या स्टेडियमच्या गॅलरीमधून खाली पडल्या. रविवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेमध्ये उमा थॉमस यांच्या डोक्याला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र आता या महिला आमदाराच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती मंत्री राजीवी यांनी दिली आहे.

महिला मंत्र्याने रुग्णालयात जाऊन घेतली भेट

उमा थॉमस यांच्यावर ज्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे त्या रुग्णालयाने सोमवारी मेडिकल बुलेटीन जारी केलं आहे. उमा यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र उमा थॉमस यांच्या फुफ्फुसांना झालेली इजा अधिक चिंताजनक असल्याचंही सांगण्यात आलं आहे. राजीवी यांनी सोमवारी रुग्णालयात जाऊन उमा यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची माहिती दिली.

मेडिकल बुलेटीनमध्ये काय माहिती?

मेडिकल बुलेटीनमध्ये सोमवारी सकाळी, प्रकृती स्थिर असली तरी उमा यांना व्हेंटीलेटरवर ठेवावं लागणार आहे. फुफ्फुसांना झालेल्या गंभीर इजेमुळे त्यांना व्हेंटीलेटवर ठेवावं लागणार आहे. गोळ्यांच्या मदतीने फुफ्फुसांची जखम भरुन काढण्यास प्राधान्य दिलं जाणार आहे, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.

डोक्याची जखम गंभीर नाही

सोमवारी सकाळी केलेल्या सीटी स्कॅनमध्ये उमा यांच्या डोक्याला दुखापत झाली असून ही जखम फारशी गंभीर नाही. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचा अंतर्गत रक्तस्राव झालेला नाही. मात्र फुफ्फुसांना झालेली जखम चिघळल्याची माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणे मणक्याला दुखापत झाल्याचं सीटी स्कॅनमध्ये समोर आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर ठेवण्याला प्राधान्य दिलं जात आहे. 

पोलिसांनी दाखल केला गुन्हा

कोच्ची शहर पोलिसांनी रविवारचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजिकांविरुद्ध सुरक्षेची काळजी न घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या उमा या व्हीआयपी गॅलरीमधून 15 फूट खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला आणि मणक्याला दुखापत झाली आहे. विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घटना घडलेल्या ठिकाणाला भेट देऊन घडलेल्या घटनेची सखोल चौकशी केली जाईल असं सांगितलं आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी केलेला प्रयत्न

'मृदंग नादम' नावाच्या या कार्यक्रमामध्ये 12 हजार डान्सर सहभागी झाले होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साकारण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना नव्हत्या असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.