गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : कुलरचे फिंटीग करताना धक्कादायक प्रकार घडला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. परभणीत (Parbhani) ही घटना घडली आहे. विजेचा धक्का लागून या दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या तापमानात वाढ झाली आहे. यामुळे कुलरची मागणी वाढली.
परभणी शहरातील रामकृष्ण नगर परिसरात ही घटना घडली आहे. रोहित उमरीकर आणि संभाजी थोरे अशी मृत तरुणांची नावे आहेत. कुलरचे काम करत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. येथे एका घरात कुलर बसवण्यात येत होता. रोहित आणि संभाजी हे दोघं युवक कुलर बसवत होते. एकाला विजेचा धक्का लागला आणि त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या युवकाने प्रयत्न केले असता त्यालाही विजेचा शॉक लागला यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. दोघांना तात्काळ एका खाजगी रुग्णालय दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
अकोल्यात सध्या या वर्षाचा अधिकतम तापमान 42.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अकोल्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत .
विदर्भात सर्व जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सियसच्या वर गेले आहे. चंद्रपूरमध्ये तापमान 43.2 अंश सेल्सियस, अकोला 42.8 अंश सेल्सियस, अमरावती 42.0 अंश सेल्सियस, यवतमाळ 41.5 अंश सेल्सियस, वाशिम 41.4 अंश सेल्सियस, वर्धा 42.5 अंश सेल्सियस, नागपूर 40.9 अंश सेल्सियस, गोंदिया 42.8 अंश सेल्सियस तर गडचिरोलीमध्ये 40.0 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.