उद्धव ठाकरेंचा भुजबळांना टोला, जामीनावर सुटलेत पण जमिनीवर नाहीत!

राममंदिर बांधण्यापेक्षा शिवसेनेचं दैवत असलेल्या बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक बांधा असा टोला भुजबळ यांनी हाणला.

Updated: Oct 23, 2018, 09:27 PM IST
उद्धव ठाकरेंचा भुजबळांना टोला, जामीनावर सुटलेत पण जमिनीवर नाहीत! title=

बीड : राममंदिर बांधण्यापेक्षा शिवसेनेचं दैवत असलेल्या बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक बांधा असा टोला लगावणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पलटवार केलाय. दैवत बदलणारे आम्हाला शिकवणार का ? असा सवाल ठाकरेंनी केलाय. याच दैवताला तुम्ही अटक करायला निघाले होते, असा टोलाही त्यांनी भुजबळांना लगावलाय.  

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चिंता कोणी करु नये. ते होणारच आहे. जे जामिनावर बाहेर पडलेत तरीही त्यांचे पाय अजून जमिनीवर नाहीत, असा जोरदार टोला उद्धव यांनी भुजबळ यांना हाणला. उद्धव ठाकरे यांनी भाजपकडून राम मंदिरचे आश्वासन निवडणुकीत दिले होते. चार वर्ष झाली तरी त्याबाबत हालचाल सुरु झालेली नाही. यावरुन भाजपवर जोरदार टीका केली. राम मंदिरचा मुद्दा हा पण जुमला आहे का, असा सवाल उपस्थित करुन तुम्ही बांधणार आहात की आम्ही बांधू, असा पवित्रा उद्धव यांनी घेतला होता. त्यावर भुजबळ यांनी प्रतिक्रीया देत शिवसेनेला डिवचले होते.

दरम्यान, नाशिक-मराठवाडा पाण्याच्या वादात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही उडी घेतली आहे. मराठवाड्यातल्या बिअरचे कारखाने बंद करा तरंच पाणी वाचेल, असा सल्ला भुजबळांनी दिला आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत पक्ष निर्णय घेईल असं सांगत भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. यावेळी भुजबळांनी भाजप आणि शिवसेनेवरही टीकेची झोड उठवली.