Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यव्यापी दौरा करणार आहेत. महाराष्ट्राचा कानाकोपरा ते पिंजून काढणार आहेत. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये जाऊन संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करणार आहेत. राज्यात स्वबळावर लढण्याची ताकद आहे की नाही याची चाचपणी करण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यभर फिरणार आहेत.
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडलंय, काँग्रेसकडून मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. मविआची वज्रमूठ घट्ट आहे असं शरद पवार-उद्धव ठाकरे-पटोले सांगत असले तरी तिनही पक्षांनी आपआपल्या ताकदीची चाचपणी करायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर राज्यातल्या आमदार, खासदार, नेते, पदाधिका-यांची महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीत 36 जिल्ह्यांचे मुख्य नेते उपस्थित होते. या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यात स्वबळावर लढण्याची चाचपणी ठाकरेंनी केल्याचं समजतंय.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरेंचं 'एकला चलो रे'? अशी तयारी सुरु केल्याचे समजते. राज्यात स्वबळावर लढण्याची ताकद आहे का याची चाचपणी झाली आहे. प्रत्येत जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद किती यावर खलबतं झाले. मुंबई महापालिका, लोकसभा निवडणुका एकट्यानं लढता येतील का यावर देेखील मंथन झाले. स्वबळावर लढण्याची वेळ आलीच तर नियोजन कसं करायचं यावर चर्चा झाल्याचं समजते. उद्धव ठाकरे ताकदीची चाचपणी करण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहेत. लोकसभा-विधानसभा निवडणुकांची तयारी करा असे आदेश ठाकरेंनी दिले आहेत. दोन दिवसांपूर्वीच खासदार विनायक राऊतांनी स्वबळाचा नारा दिला होता. तर, दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी स्वबळाच्या चर्चा फेटाळल्यात. उलट भाजपच अफवा पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे राज्यातली राजकीय समीकरणं 180 अंशात बदललीयेत. शरद पवार राज्याचा दौरा करणार आहेत. काँग्रेसचे दिल्लीतले पक्षश्रेष्ठी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मविआ एकसंध आहे असं नेते सांगत असले तरी प्रत्येक पक्षानं स्वबळाची चाचपणी सुरु केलीय. आता ठाकरेंनी एकला चलो रे ची भूमिका घेतली तर त्याचा फायदा कुणाला होणार, तोटा कुणाला होणार याची चर्चा सुरु झाली आहे.
मातोश्रीवर घेतलेल्या बैठकीत ठाकरे गटाच्या राज्याच्या दौ-याबाबत चर्चा करण्यात आली. उद्धव ठाकरेंच्या राज्यातल्या दौऱ्याची सुरवात विदर्भातून होणार आहे. 8 जुलैला अमरावती दौरा तर, 9 जुलैला उद्धव ठाकरे यवतमाळमध्ये येणार आहेत. विदर्भ दौऱ्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सभा घेऊन शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. मातोश्रीवरच्या बैठकीत समान नागरी कायद्याबाबतही चर्चा करण्यात आली. बाळासाहेबांचीही समर्थनाची भूमिका होती. मात्र कायद्याचा मसुदा पाहून याबाबत भूमिका जाहीर करण्याचा निर्णय़ बैठकीत घेण्यात आला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरेंनी या बैठकीत पदाधिका-यांना दिल्या.