भाजपमध्ये जा, वेगळा पक्ष काढा पण.., उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला जाहीर आव्हान

फेसबुक लाईव्हद्वारे उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला आव्हान दिलं आहे, भाजपमध्ये जा पण...

Updated: Oct 9, 2022, 07:05 PM IST
भाजपमध्ये जा, वेगळा पक्ष काढा पण.., उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला जाहीर आव्हान

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीआधी (Andheri Bypoll Election) निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवल्यावर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत संवाद साधला. (Shivsena Election Symbol Bow And Arrow) यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटावर जोरदार आसुड ओढलं आहे. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला उघडपणे आव्हान दिलं आहे. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?  
तुमची बुद्धी गोठलेली नसेल तर माझं आजही तुम्हाला आव्हान आहे बाळासाहेबांचं नाव न वापरता जनतेसमोर या. स्वत: पक्ष काढा, भाजपमध्ये जा पण तुम्हाला प्रत्येकवेळेला ज्या बाळासाहेबांनी जपलं, बाळासाहेब पाहिजेत पण बाळासाहेबांचा मुलगा नको. कारण तुम्हाला शिवसेना ठाकरे वगळून जी राहणार आहे ती गोशाळेत बांधायची आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आव्हान दिलं आहे.

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला 3 चिन्ह आणि नावं दिलीत
त्रिशूल, उगवता सूर्य, मशाल ही तीन चिन्ह दिली आहेत, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी 3 नावे दिली आहेत. 

काय मिळवलं तुम्ही. ज्या शिवसेनेने मराठी मनाला आधार दिला. हिंदू अस्मिता जपली. ते नाव तुम्ही गोठवलं. अनेकांचे फोन आले. अनेक जण रडत आहेत. पण संकट असेच असतात. त्यातच संधी असते. त्याचं सोनं मी करुन दाखवणार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यासोबतच त्यांनी शिंदे गटाचा मिंधे गट म्हणून असा उल्लेख केला आहे.