साताराः किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदीर या उदयनराजेंच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर जिल्ह्यात चर्चांना उधाण आलं आहे..
या निवडणुकीत मकरंद पाटील यांना खासदार उदयनराजे भोसले यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी मोठी मदत केल्याचे बोललं जात आहे. यामुळेच मकरंद पाटील हे अचानक जलमंदीर या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी उदयनराजे यांचे आभार मानले आहेत, अशी चर्चा दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. या भेटीदरम्यान नक्की काय चर्चा झाली या बाबत मात्र गूढ कायम आहे.
यावेळी उदयनराजेंनी मकरंद आबांचं जोरदार स्वागत केलं. 3 कारखाने, 1 जिल्हा बँक आणि आमदारकी असलेले सातारा जिल्ह्याचे बॉस आले, अशा शब्दात उदराजेंनी मकरंद आबांचं वेलकम केलं. उदयनराजेंचे स्वागताचे शब्द ऐकून मकरंद आबांच्या चेहऱ्यावर कमालीचं हास्य खुललं.
निवडणूक निकालानंतर जलमंदिर पॅलेसमध्ये जाऊन मकरंद आबांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन आबांनी उदयनराजेंचं स्वागत केलं. सत्कारावेळीही उदयनराजेंनी खट्याळपणा दाखवला. आबांनी आपल्या गळ्यात घातलेली शाल त्यांनी पुन्हा आबांच्याच गळ्यात घातली. तसेच त्यांनी दिलेला पुष्पगुच्छ पुन्हा त्यांच्याच हाती सोपवला. उदयनराजेंच्या मिश्किल कृतीने उपस्थितांमध्ये हास्याचे कारंजे उडाले.