VIDEO : युतीसाठी शिवसेनेसमोर भाजपने हात जोडले - चंद्रकांत दादा

एका भाजप नेत्यानं केलेल्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात

Updated: Nov 9, 2018, 11:48 PM IST
VIDEO : युतीसाठी शिवसेनेसमोर भाजपने हात जोडले - चंद्रकांत दादा

प्रताप नाईक, प्रतिनिधी, झी मीडिया, कोल्हापूर : शिवसेनेबरोबर युती होण्यासाठी संवाद नाही तर हात जोडून विनंती केली जात आहे, असं वक्तव्य भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलंय. 'झी २४ तास'शी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलंय. 

हिंमत असेल तर काँग्रेसनं हाताच्या चिन्हावर, राष्ट्रवादीनं बंद पडलेल्या घड्याळ्याच्या चिन्हावर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शिट्टी चिन्हावर लढावं मग आम्हीसुद्धा शिवसेनेला सोबत न घेता एकटे लढू आणि राज्यात क्रमांक एकचा पक्ष असल्याचं सिद्ध करु, असं खुलं आव्हानही महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिलंय.

दुष्काळग्रस्त भागातील जनतेला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार पाऊल उचलत आहे. दुष्काळग्रस्त भागात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. असं असलं तरी दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या उभारल्या जाऊ नयेत, असं माझं वैयक्तिक मत असल्याचंही चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलंय.

अमित शहा-उद्धव ठाकरे यांची भेट 

दरम्यान, जून महिन्याच्या सुरुवातीलाच भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन बंद दरवाज्याआड भेट घेतली होती. ही बैठक नियोजीत वेळेपेक्षा दीड तास अधिक म्हणजे तब्बल दोन तास चालली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेही या चर्चेत सहभागी झाले होते. 

या भेटीनंतर 'झी २४ तास'चे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांच्याशी बोलताना, उद्धव ठाकरेंशी चर्चा करून नाराजी दूर करण्यात यश येणार... यापुढेही शिवसेनेसोबत लोकसभा-विधानसभा निवडणूक लढू, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला होता. परंतु, चंद्रकांत दादा पाटील यांच्या या वक्तव्यानंतर मात्र युतीवर अजूनही प्रश्नचिन्हच आहेत. 

मुख्यमंत्र्यांचं 'ते' सूचक वक्तव्य

तर, नुकतंच झी २४ तासचे कार्यकारी संपादक प्रसाद काथे यांच्याशी संवाद साधताना 'सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणुका लढवण्याची गरज' असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.