वाल्मिक जोशी, जळगाव : जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोविड रुग्णालयातील भोंगळ आणि बेजबाबदारपणा सातत्याने समोर येत आहे. रुग्णालयातून गायब झालेल्या एका कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेचा मृतदेह तब्बल आठ दिवसांनी रुग्णालयाच्या शौचालयात आढळून आल्याची घटना ताजी असतानाच संशयित कोविड रुग्णांच्या वॉर्डमध्ये एका रुग्णाचा मृतदेह तब्बल पाच तास पडून असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संशयित कोरोना रुग्ण असलेल्या वॉर्ड क्रमांक सहामध्ये एका संशयित रुग्णाचा मृतदेह तब्बल पाच तास पडून होता, असा आरोप होत आहे. या रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. पण अहवाल येण्याआधीच त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, त्या रुग्णाचा अहवाल नंतर पॉझिटिव्ह आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
अनेक तास हा मृतदेह वॉर्डमध्येच पडून असल्याने आजुबाजूच्या रुग्णांमध्येही घबराट पसरली होती. महाविद्यालयाचे प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी हा मृतदेह वॉर्डमधून हलवण्याची तसदी घेतली नाही. एका खाटेवर हा मृतदेह झाकून ठेवण्यात आला होता.
काही तासांनी त्या रुग्णाचा मृतदेह उचलण्यात आला, पण कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सफाई करण्याची किंवा सॅनिटायझेशन करण्याची तसदी घेतली नाही, असा आरोप रुग्णांनी केला. नंतर दुसऱ्या रुग्णाला त्या बेडवर आणण्यात आले. त्यामुळे जळगाव वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे बेपत्ता वृद्ध महिला रुग्णाचा मृतदेह शौचालयात सापडल्यानंतर सरकारने त्याची गंभीर दखल घेऊन डीनसह डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतर हा प्रकार समोर आल्याने आणखीच गांभीर्य वाढले आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून मृतांचा आकडाही अधिक आहे. त्यात रुग्णालयातील अनागोंदीमुळे रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्याचीही भीती वाटू लागली आहे. ही अनागोंदी रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावलं टाकावीत अशी मागणी होत आहे.