मुंबई : मान्सूनसंदर्भातली आनंदाची बातमी..अरबी समुद्रात गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून अखेर केरळात दाखल झाला. यंदा वेळेआधीच मान्सून केरळात दाखल झाला असल्याची माहिती हवामान खात्याने दिलीय. तर मान्सूनचा पुढचा प्रवासही वेळेत होणार आहे आणि मान्सून 6 जून ते 10 जून या काळात महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
उद्यापासून राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी होण्याचा इशारा देण्यात आलाय. मान्सूनच्या प्रवासाला पोषक वातावरण आहे. उद्यापासून सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या प्रामुख्याने दक्षिण भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
काही भागांत सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.पश्चिम विदर्भात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.