अमर काणे, झी मीडिया, नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा रविवारी समारोप होत आहे. तब्बल २५ दिवस चाललेल्या या शिबिरात
देशातील ८२८ स्वयंसेवक सहभागी झाले होते. यंदा समारोप समारंभात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच जाहीर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या वर्षी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या संघस्थानावरील उपस्थितीमुळे देशात चर्चेचा विषय झाला होता. यंदा प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांना आमंत्रण देण्यात आले होते. मात्र व्यस्त कार्यक्रमामुळे ते उपस्थित राहू शकणार नाहीत. सरसंघचालक डॉ मोहन भागवत यावेळी संबोधित करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर होणा-या या समारोप कार्यक्रमात सरसंघचालक काय बोलतात यासंदर्भातील उत्कंठा शिगेला पोहचली आहे.
विजयादशमीनंतर तृतीय वर्ष शिबिराच्या समारोप प्रसंगी सरसंघचालक आपली भूमिका आणि मनोगत व्यक्त करत असतात. त्यामुळे या समारोप सोहळ्याला विशेष महत्व असते. रविवारी होणा-या या समारोप कार्यक्रमाची पूर्ण तयारी झाली आहे.