महिलांनी डंपर चालकांना अंगातला शर्ट काढून रस्ता पुसायला लावला...कारण

सांडलेली राख डंपर चालकांना दाखवली, काही मूजोर साधं ऐकून घेण्यासाठी खाली उतरायला तयार नव्हते.

Updated: Jun 25, 2021, 08:34 PM IST
महिलांनी डंपर चालकांना अंगातला शर्ट काढून रस्ता पुसायला लावला...कारण title=

बीड : परळीच्या थर्मल पावर प्रोजेक्टमधील राख रस्त्याच्या कडेला वाहतूक करताना सांडते, नंतर या राखेचा प्रचंड त्रास हा स्थानिक रहिवाशांना होतो. या राखेमुळे श्वसनसंस्थेचा आजार देखील बळावतात. हे सर्व स्थानिक महिलांना असह्य झालं, स्थानिक पुढाऱ्यांनी देखील यावर कारवाई करु, कारवाई करु असा नाटकी सूर कायम ठेवल्याने, ही वाहतूक अशीच सुरु आहे. तहसिलदारांनी तर हे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत असताना, कोणतीही ठोस कारवाई केल्याचं अजून समोर आलेलं नाही.

येथील स्थानिक महिलांना राखेच्या धुळीचा त्रास असह्य झाल्याने, महिलांनी हे सर्व राखेचे डंपर अडवून खाली सांडलेली राख डंपर चालकांना दाखवली, काही मूजोर साधं ऐकून घेण्यासाठी खाली उतरायला तयार नव्हते.

यातील एका महिलेने डंपर चालकाच्या केबिनच्या दाराजवळच्या आरशाला लटकून त्याला चपलांचा प्रसाद दिला, तर काही महिलांनी चपलेने चोप दिला. अखेर या डंपरच्या ४ ते ५ ड्रायव्हर्सने अंगातलं शर्ट काढून रस्त्यावरील राखेची धूळ साफ केली. महिलांनी दिलेल्या या चपराकीचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे, या व्हीडिओतील महिलांचं कौतुक होत आहे.