सागर गायकवाड, नाशिक : ग्रामीण पोलिसांनी अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या पाच संशयिताच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे..विशेष म्हणजे या मुलीचं लग्न करून देण्यासाठी तिचं अपहरण करण्यात आलं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओझर शहरातून एका 14 वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार ओझर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या मुलीचा शोध घेण्यासाठी ओझर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. या सीसीटीव्ही फुटेज मध्ये मुलीला एक महिला घेऊन जात असताना दिसली. CCTV फुटेजच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारी महिला पोलिसांच्या नजरेस पडली. प्रियंका देविदास पाटील असे ताब्यात घेतलेल्या संशयित महिलेचं नाव असून ती सध्या ओझर, ता. निफाड येथे वास्तव्यास आहे. या महिलेची कसून चौकशी केली असता तिने तिची मैत्रिण नागे रत्ना कोळीच्या मदतीने शिरपुर येथील एक महिला व पुरुषास १ लाख ७५ हजार रुपयात या मुलीला विकल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी धुळे येथील महिला सुरेखाबाई जागो मिला, आणि नाशिक मधील महिला रत्ना विक्रम कोळी, या दोघांना तपासासाठी ताब्यात घेतले. या महिलांची चौकशी केली असता, मुलीला गुजरात राज्यात लग्नासाठी दिले असल्याचे सांगितले.
पोलिसांनी गुजरात राज्यात पोलीस पथक पाठवले याठिकाणी मुलीचा शोध घेण्यात आला. मात्र मुलीला मध्यप्रदेशातील खरगोण जिल्ह्यात नेल्याचे समजले. यानंतर पोलीस पथक तत्काळ खरगोण कडे रवाना झाले.
खरगोण जिल्ह्यात मुलीचा शोध घेतला असता खरगोण जिल्ह्यातील लखापुर गावातील बाबुराम येडु मनसारे, गोविंद नानुराम मनसारे यांच्या घरी ही मुलगी सापडली. मुलीची पोलिसांनी सुखरूप सुटका केली असून मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शहर आणि जिल्ह्यातून गेल्या काही दिवसापासून मुलींचे अपहरणाचे गुन्हे वाढले आहे या प्रकरणात या टोळीचा हात आहे का याचा तपास पोलीस करत आहे. मुलगी मिळाल्याने मुलीच्या कुटूंबियांनी पोलिसांचे आभार मानले आहे.