स्वस्त जेवण आणि पर्यटन पडलं महाग, कोल्हापूरच्या तरुणांना गोव्यात बेदम मारहाण

गोव्यात पर्यटनाला जात असाल तर सावधान, तरुणांना अर्धनग्न करुन मारहाण आणि लुटमार

Updated: Jun 1, 2022, 02:43 PM IST
स्वस्त जेवण आणि पर्यटन पडलं महाग, कोल्हापूरच्या तरुणांना गोव्यात बेदम मारहाण title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : पर्यटकांचं सर्वाधिक आवडतं टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणजे गोवा. गोव्यात (Goa) मजा मस्ती धमाल करण्यासाठी अनेक पर्यटक वर्षभर नियोजन करत असतात. पण आता गोव्याला जाणार असाल तर सावधान. पर्यटकांना फसवणारी टोळी गोव्यात सक्रीय झाल्याचं उघड झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडमधल्या युवकांना याचा फटका सहन करावा लागला आहे. 

कोल्हापूरमधले तीन तरुण गोव्यात पर्यटनासाठी गेले होते. हे तरुण गोव्यात धमाल मजा मस्ती करत असतानाच एका टोळीने त्यांना गाठलं. त्यानंतर हे तरुण गोव्याहून परतत असताना या टोळीने चांगलं आणि स्वस्त जेवण देतो असं सांगून एका ठिकाणी नेलं. पण त्या ठिकाणी हॉटेल किव्हा मेस नव्हती. 

चंदगडच्या या तरुणांना आपण फसलो गेलोय हे कळायच्या आत या तरुणांना धमकावत एका रूममध्ये कोंडून बेदम मारहाण करण्यात आली यानंतर त्यांच्याजवळ असलेले पैसे, सोनं आणि अन्य मौल्यवान वस्तू काढून घेतलं. इतक्यावर न थांबता या टोळीतील तरुणांनी गळ्यावर चाकू ठेऊन ऑनलाईन पद्धतीने पैसे मागवून घेतले त्यानंतर या तरुणांचे कपडे काढून पुन्हा मारहाण केली.

या मारहाणीत तीनही तरुण बेशुद्ध देखील झाले. या सर्व तरुणांना रूम मध्ये पुन्हा आणलं आणि त्याचे व्हिडीओ काढले.  त्यानंतर या प्रकरणी कुठे तक्रार केली तर मुलींवर अत्याचार केला अशी खोटी केस पोलिसात देऊअशी धमकी दिली आणि त्यानंतर त्यांना सोडून दिलं.

या सर्व प्रकाराने घाबरलेल्या तरुणांनी कसंबसं चंदगड गाठलं. त्यानंतर या तरुणांनी हिम्मत दाखवीत सामाजिक कार्यकर्त्यामार्फत चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चंदगड पोलिसांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी पीडित तरुणांना घेवून तपासासाठी गोव्याला घेवून गेले. 

त्यानंतर म्हापसा पोलिसांनी या प्रकरणाची सत्यता पडताळत लुटणाऱ्या टोळीत सहभागी असलेल्या तिघांना तात्काळ अटक केली. या टोळीतील आणखी काही जणांचा समावेश असून पोलीस या टोळीतील अन्य तरुणांचा शोध घेत आहेत. 

दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात अशा प्रकारे कोणी पर्यटकाना लुटत असेल तर त्याची गय केली जाणार नाही असं म्हटलंय. त्याचबरोबर म्हापसा तरुणांना लुटणाऱ्या प्रकरणाचा 24 तासात छडा लावला असल्याचं देखील सांगितलं आहे.