औरंगाबाद : शहरात एका ग्राहकाने झोमॅटोवरून पनीर-चिली मागवली असता त्यांच्या घरी थेट प्लास्टिकचे तुकडे पोहोचले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत जिन्सी पोलीस ठाण्यात झोमॅटो आणि हॉटेल विरोधात तक्रार देण्यात आली आहे. सचीन जमधडे या ग्राहकाने तशी तक्रार दिली आहे.
गुरुवारी संध्याकाळी त्यांनी झोमॅटोवरून पनीर-चिली आणि इतर काही पदार्थांची ऑर्डर केली होती. मात्र घरी आल्यानंतर जेवताना पनीर तुटत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर नीट निरखून पाहिले असता संबंधित पदार्थ हा पनीर नसल्याचे लक्षात आले त्यानंतर सचिन जगधडे यांनी संबंधित हॉटेल गाठून चौकशी केली.
यावेळी हॉटेल चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर ग्राहक सचिन जगधडे यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हॉटेल एस स्क्वेअर असे या हॉटेलचे नाव आहे. तर प्लास्टिक सदृश असणारा पदार्थ एफडीएकडे तपासणीसाठी दिला असल्याची माहितीही जमधडे यांनी दिली.