उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : अभिषेक घोसाळकर प्रकरणावरुन उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं. महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

आकाश नेटके | Updated: Feb 10, 2024, 03:25 PM IST
उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय - देवेंद्र फडणवीस title=

Abhishek Ghosalkar Case : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी शंका उपस्थित करत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यासोबत राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवारांना जास्त काही माहिती नसतं. ते अशा काही सनसनाटी गोष्टी बोलत असतात. कुठल्याही गोष्टीची योग्य प्रकारे चौकशी होईलच. पण विनाकारण अलीकडच्या काळात जे गोपिचंद जासूस, जग्गा जासूस तयार झाले आहेत. त्यांनी जरा विचारपूर्वक बोललं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"मला वाटतं की उद्धव ठाकरेंची जी भाषा आहे आणि ते जे बोलले त्यावरुन ठाम मत झाले आहे की, उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता गेट वेल सून एवढेच म्हणेन. त्याच्यापलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही. मी एवढीच ईश्वराकडे प्रार्थना करेल आणि त्यांना म्हणेल उद्धवजी गेट वेल सून," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर बोलण्यासाठी आणि गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी माझ्यासाठी शब्द नाहीत. याआधी मी त्यांना उद्देशून फडतूस शब्द वापरला होता. पण आता तोही तोकडा पडतोय. या महाराष्ट्राला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे का? असा प्रश्न मला पडला आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तुमच्या शिव्या महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत आहे - चंद्रशेखर बावनकुळे

"उद्धव ठाकरे जी, आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना आज तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या. तुमच्याबद्दल कीव वाटू लागली. राजकारणात आपल्या विरोधकांवर टीका करायची असते. पण ती करताना सभ्यता, संस्कृती पाळावी लागते. परंतु अलीकडच्या काळात आपण ज्या पद्धतीने भाजपा आणि देवेंद्र जी यांच्यावर टीका करीत आहात, ते बघितल्यानंतर आपल्या प्रकृतीची अधिकच काळजी वाटू लागते. जाहीर सभेतील आपली भाषणे, पत्रकार परिषदेतील आपली विधाने ऐकल्यानंतर आपण सध्या प्रचंड मानसिक तणावात आहात, हे लक्षात येते. आपली ही अवस्था आपण स्वतःचा हाताने करवून घेतली. 'असंगाशी संग' केल्यानंतर असेच होणार. 
देवेंद्रजी यांच्यावर आज आपण ज्या खालच्या भाषेत टीका केली तो तळ आम्हाला गाठता येणार नाही. पण तुमची भाषा, तुमचे टोमणे, तुमच्या शिव्या, तुमचे नैराश्य या साऱ्याच गोष्टी हा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत आहे. तुम्ही या बिकट मनोवस्थेतून लवकर बाहेर पडावेत, एवढीच प्रार्थना करणे आमच्या हातात आहे," असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.