गाड्या पार्क करताना सावधान! आजपासून ५ ते १० हजारांचा दंड

पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्रातील २३ ठिकाणांच्या परिसरात होणार कारवाई

Updated: Jul 7, 2019, 01:50 PM IST
गाड्या पार्क करताना सावधान! आजपासून ५ ते १० हजारांचा दंड title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहनतळांलगतच्या अतिक्रमित स्वरुपाच्या अनधिकृत पार्किंगवर धडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत. या अनुषंगाने पहिल्या टप्यात महापालिकेच्या २३ सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर परिसरात आढळून येणा-या अनधिकृत पार्किंगवर रविवारपासून दंडात्मक कारवाई सुरु करण्यात येत आहे. 

या अंतर्गत संबंधित परिसरात एखादे अवजड वाहन अनधिकृतपणे उभे असल्याचे आढळून आल्यास त्यावर किमान १५ हजार रुपये दंड आकारणी करण्यात येणार आहे. मध्यम आकाराच्या वाहनांवर रुपये ११ हजार; तर कार-जीप यासारखी वाहने अनधिकृतपणे 'पार्किंग' केले असल्याचे आढळून आल्यास त्यावर रुपये १० हजार एवढी दंड आकारणी करण्यात येणार आहे. रिक्षा, 'साईडकार असलेले दुचाकी वाहन' इत्यादी तीन चाकींवर रुपये ८ हजार, तर अनधिकृतपणे 'पार्क' केलेल्या दुचाकी वाहनांवर किमान रुपये ५ हजार एवढी दंड आकारणी करण्यात येणार आहे. सध्या २३ ठिकाणी सार्वजनिक वाहनतळ सुरु असून यापैकी ७ ठिकाणचे वाहनतळ हे कंत्राटदाराची नियुक्ती होईस्तोवर मोफत असणार आहेत.

महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर व रस्त्यांलगत अतिक्रमित स्वरुपात अनधिकृत 'पार्किंग' होत असल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होऊन वाहनांची गती मंदावत आहे. नागरिकांना आपली वाहने 'पार्क' करणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेद्वारे विविध १४६ ठिकाणी तब्बल ३४ हजार ८०८ वाहने 'पार्क' करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तथापि, अनेक ठिकाणी वाहनतळांचा वापर न करता लगतच्या रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग केले जात आहे. हे लक्षात घेऊन वाहनांच्या पार्किंगला शिस्त यावी आणि वाहतूक सुरळीत रहावी, याकरिता पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या २३ ठिकाणी असणा-या महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर परिसरातील रस्ते वा पदपथांवर अनधिकृत 'पार्किंग' केलेल्या वाहनांवरील कारवाईला उद्यापासून सुरुवात होत आहे. या अनुषंगाने संबंधित परिसरात महापालिकेच्या वाहतूक खात्याद्वारे आवश्यक ते सूचनाफलक यापूर्वीच बसविण्यात आले आहेत.

महापालिका क्षेत्रातील वाहतूक अधिकाधिक सुरळीत व्हावी, याकरिता महापालिका प्रशासन नियोजन व अंमलबजाणी विषयक सर्वस्तरीय प्रयत्न नियमितपणे करत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महापालिका क्षेत्रातील अनधिकृत पार्किंगबाबत सुनियोजीत कारवाई सुरु करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २३ ठिकाणी असणा-या महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांच्या लगतच्या परिसरात कारवाई करण्यात येणार आहे. तसेच आणखी ३ ठिकाणी सार्वजनिक वाहनतळ लवकरच सुरु होणार आहेत. या ३ ठिकाणांसाठी निविदाप्रक्रियेअंती कंत्राटदारांची निवड करण्यात यापूर्वीच करण्यात आली असून करारनामा झाल्यानंतर हे वाहनतळ सुरु होतील. ज्यामुळे सध्या २३ ठिकाणी असलेल्या सार्वजनिक वाहनतळांची संख्या २६ होणार आहे.

तसेच या कारवाईच्या दुस-या टप्प्यात महापालिका क्षेत्रातील काही रस्ते 'नो पार्किंग झोन' म्हणून निर्धारित करण्यात येणार असून सदर रस्त्यांवर आढळून येणा-या अतिक्रमित स्वरुपाच्या अनधिकृत पार्किंगवर देखील महापालिकेद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या सर्व ७ परिमंडळीय उपायुक्तांना / सहआयुक्तांना संबंधित रस्ते निर्धारित करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

पहिल्या टप्प्यातील अनधिकृत पार्किंगविरोधातील कारवाईचे नियोजन व व्यवस्थापन हे महापालिकेच्या संबंधित प्रशासकीय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या स्तरावर करण्यात येणार असून त्यांच्याद्वारे कारवाईचा दैनंदिन अहवाल तयार करण्यात येणार आहे.

महापालिकेद्वारे करण्यात येणा-या अनधिकृत पार्किंग विरोधातील कारवाईसाठी आवश्यकतेनुसार वाहतूक पोलीसांचे सहकार्य देखील घेण्यात येणार आहे. या कारवाई अंतर्गत जी वाहने अनधिकृत पद्धतीने अतिक्रमित स्वरुपात व अनधिकृत पद्धतीने 'पार्क' केलेली आढळून येतील ती 'टोचन' (कर्षित / Towing) करण्यात येणार आहेत. टोचन केलेल्या वाहनांवर संबंधित व्यक्तींद्वारे मालकी हक्काचा दावा होईस्तवर व सदर वाहने सोडवून नेईस्तोवर जेवढे दिवस सदर वाहन ताब्यात असेल, तेवढ्या दिवसांसाठी वाहनांवर 'प्रति दिन' विलंब आकार देखील लावण्यात येणार आहे. टोचन केलेली वाहने संबंधित मालकांद्वारे ३० दिवसांच्या आत सोडवून न नेल्यास ती वाहने बेवारस असल्याचे समजून त्यांची लिलावामध्ये विक्री करण्यात येईल.

अनधिकृत पार्किंगबाबत वसूल करण्यात येणारा दंड व शुल्काचा संक्षिप्त तपशील पुढीलप्रमाणे:









अनु.

वाहनाचा प्रकार

टोचन शुल्क(Towing Charges)

दंड / Penalty

एकूण किमान देय रक्कम(रुपये)

प्रतिदिन विलंब आकार

कमाल विलंब आकार

एकूण कमाल देय रक्कम(रुपये)

1

अवजड वाहन(Heavy Motor Vehicles)

5000

10000

15000

275

11000

23250

2

मध्यम आकाराची वाहने(Medium Motor Vehicles)

3300

7700

11000

220

8800

17600

3

छोट्या आकाराची चार चाकी वाहने(Light Motor 4 Wheeler Vehicles)

2500

7500

10000

170

6800

15100

4

तीन चाकी वाहने(Three Wheeler Vehicles)

1100

6900

8000

140

5600

12200

5

दुचाकी वाहने(Two Wheeler Vehicles)

700

4300

5000

110

4400

8300

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात काही नियम व तरतूदींच्या अधिन राहून विकासकांना सार्वजनिक वाहनतळ उभारुन महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याच्या बदल्यात अतिरिक्त चटई क्षेत्र (FSI)देण्यात येते. तथापि, अशा प्रकरणी जोवर वाहनतळ महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येत नाहीत, तोवर याप्रकारचे चटईक्षेत्र संबंधित विकासकाला देण्यात येत नाही. ही बाब लक्षात घेता, वाहनतळ उभारुन महापालिकेकडे हस्तांतरित न केलेल्या कोणत्याही प्रकरणात कुणालाही अतिरिक्त चटईक्षेत्र देण्यात आलेले नाही, याची कृपया नोंद घ्यावी.