मुंबई : आता महाराष्ट्रात 'शिंदे सरकार' आलंय. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पदभार सांभाळला आहे. गुरूवारी 30 जून रोजी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी राजभवनात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री होताच त्यांनी एक लक्षवेधी कृती केली. (After taking oath CM Eknath shinde remembers shivsena supremo balasaheb thackeray)
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आलेल्या या शिवसैनिकानं आपल्या ट्विटर अकांऊटचा प्रोफाईल फोटो बदलला. फोटोमध्ये मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत दिसत आहेत.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कमाल सत्तानाट्य सुरू होते. अखेर (30 जूनला) शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवस यांनी केली.
शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले बंडखोर आमदार यांनी सुरुवातीपासूनच कट्टर शिवसैनिक असल्याचा दावा केला आहे. तसेच ते बाळासाहेब ठाकरे आपल्यासाठी दैवत असल्याचंही आपल्या कृतीतून दाखवत आहेत. इतकंच काय, शिंदे गटाचे नाव सुद्धा शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे ठेवण्यात आले होते. मात्र शिवसेना पक्षाने याला विरोध दर्शवल्यामुळे हे नाव मागे घेण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आठवले बाळासाहेब....
एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर जो प्रोफाईल फोटो अपलोड केला आहे, त्यात बाळासाहेब ठाकरेही दिसत आहेत. फोटोत बाळासाहेब ठाकरे खुर्चीवर बसलेले आणि त्यांच्याजवळ एकनाथ शिंदे पाहायला मिळत आहेत. हा फोटो पाहता, अतिशय महत्त्वाच्या अशा क्षणी मुख्यमंत्र्यांना बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आल्याचं म्हटलं जात आहे.
मी बाळासाहेबांचा शिवसैनिक
मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय़ झाल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले होते, 'भाजपकडे 115 ते 120 आमदार होते. मात्र, तरीही त्यांनी मला मुख्यमंत्री होण्यासाठी समर्थन दिले. मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो'.