'अर्थ खात्याकडून राष्ट्रवादीला झुकते माप; शिवसेनेचे आमदार नाराज'

अर्थखात्याकडून करण्यात येणाऱ्या निधीवाटपातही अजित पवार यांच्याकडून दुजाभाव केला जात आहे. 

Updated: Aug 11, 2020, 04:01 PM IST
'अर्थ खात्याकडून राष्ट्रवादीला झुकते माप; शिवसेनेचे आमदार नाराज' title=

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेल्या अर्थखात्याकडून कायम राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप दिले जात असल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरल्याचा दावा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. त्यांनी मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओत म्हटले आहे की, अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते असल्याने शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे लवकर होतात.

'फोडाफोडीचे राजकारण काय असते हे राष्ट्रवादी भाजपला दाखवून देईल'

महाविकासआघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून केवळ आपल्या आमदारांना सशक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विविध योजनांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी दिला जात आहे. तसेच अर्थखात्याकडून करण्यात येणाऱ्या निधीवाटपातही अजित पवार यांच्याकडून दुजाभाव केला जात आहे. या सगळ्याची तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

भाजप सोडून कोणी जातं का? चंद्रकांत पाटलांनी उडवली राष्ट्रवादीची खिल्ली

भविष्यात शिवसेनेच्या आमदारांकडून कामं झाली नाहीत तर जनतेचा रोष वाढेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनही आपल्याला निधी मिळत नाही, याची खंत शिवसेनेच्या आमदारांना वाटते. यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अशीच नाराजी होती. आता निधी वाटपावरून शिवसेना नेते नाराज झाले आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात महाविकासआघाडीत अशा कुरबुरी सुरुच राहतील. मात्र, शिवसेनेतील अनेक आमदार नाराज आहेत, ही वस्तुस्थिती असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. 

यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये केलेला प्रवेश अशा मुद्द्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मात्र, त्यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेत हे वाद सामोपचाराने मिटवले होते.