भाजप सोडून कोणी जातं का? चंद्रकांत पाटलांनी उडवली राष्ट्रवादीची खिल्ली

आमदारांच्या मतदारसंघातील विकासाची कामंही होत नाहीत. म्हणून आमदार पवारांना भेटतात. 

Updated: Aug 10, 2020, 04:23 PM IST
भाजप सोडून कोणी जातं का? चंद्रकांत पाटलांनी उडवली राष्ट्रवादीची खिल्ली

किरण ताजणे, झी मीडिया, पुणे: सहा वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेलेले अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक असल्याचा दावा भाजपकडून फेटाळण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यात झालेल्या पत्रकारपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दाव्याची खिल्ली उडविली. भाजपमधून कोणी जातं का, असा प्रतिप्रश्नच त्यांनी सगळ्यांना विचारला. शरद पवार आणि महाविकासआघाडीचे नेते हे केवळ त्यांच्या आमदारांचा आत्मविश्वास वाढवत आहेत. भाजपच्या १०५ आमदारांपैकी ८० जणांनी तिकडे जातील, ही सोप्पी गोष्ट वाटते का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

'फोडाफोडीचे राजकारण काय असते हे राष्ट्रवादी भाजपला दाखवून देईल'

मुळात भाजपचा कोणताही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात नाही. या सरकारमध्ये इतकी खुन्नस काढली जातेय, की आमदारांच्या मतदारसंघातील विकासाची कामंही होत नाहीत. म्हणून आमदार पवारांना भेटतात. विकासकामे मार्गी लावण्यासाठी पवारांकडे आग्रह धरावा लागतो. याचा अर्थ भाजपचे आमदार तिकडे चालले असा होत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

तत्पूर्वी चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. पुण्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना जम्बो रुग्णालये उभारण्याची काय आवश्यकता आहे? तीन रुग्णालये उभारून ३०० कोटींचा खर्च कशासाठी, असे सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले. आता मुंबईतील रुग्णालये रिकामी आहेत. नवी रुग्णालये उभारण्याऐवजी त्याचा वापर व्हावा. तसेच महापालिका अधिकाऱ्यांनी लोकांना रोज सोप्या शब्दांत कोरोना परिस्थितीचा माहिती द्यावी. सध्या पुण्यात ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.