हरियाणात सत्तास्थापन करणारे अमित शहा महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात मिसिंग

हरियाणात सरकार स्थापन पण महाराष्ट्रात कधी ?

Updated: Nov 2, 2019, 05:32 PM IST
हरियाणात सत्तास्थापन करणारे अमित शहा महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात मिसिंग title=

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आधी युतीची घोषणा होण्याआधी उद्धव ठाकरे, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बंद खोलीत चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय ठरलं हे या तीन नेत्यांनाच माहित आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या निकालात शिवसेना किंगमेकर ठरली आहे. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आणि ५०-५० फॉर्म्युल्यावर ठाम आहे. यावरुन सत्तासंघर्ष पाहायला मिळतो आहे. महाराष्ट्रातील जनता राज्यात कधी सरकार स्थापन होणार याची वाट पाहत आहेत. पण या तिघांमधला एक मोठ्ठा चेहरा सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात मिसिंग आहे. 

२४ ऑक्टोबरला महाराष्ट्र, हरियाणाचा निकाल लागला. हरियाणात काँग्रेस-जेजेपी सरकार येणार म्हणता म्हणता अमित शाहांनी तिथे सर्जिकल स्ट्राईक केला आणि भाजप आणि जेजेपी सरकारचा शपथविधी झाला सुद्धा. पण अमित शाहांची तीच धडाडी आणि तीच सुपरअॅक्शन महाराष्ट्रात दिसत नाही.

विधिमंडळ नेतेपदी फडणवीसांची निवड होण्यावेळीही अमित शाह येणार होते. पण आले नाहीत. त्यानंतर २ नोव्हेंबरला येणार होते. आले नाहीत
आणि आता अमित शाह येणार की नाही, याचं उत्तर भाजपच्या कुठल्याही नेत्याकडे नाही. भाजपला अपेक्षित आकडा गाठता आला नाही. आणि निवडणूक निकालानंतर शिवसेनेनंही गुरगुरायला सुरुवात केली. त्यावरुनही अमित शाह नाराज असल्याची चर्चा आहे. 

ऱाज्यातली कोंडी फोडा, चर्चा सुरू करा, मगच मी येईन, असा निरोप दिल्लीनं धाडल्याचं समजतंय. पण भाजपचा मुख्यमंत्री करायचा असेल तर अमित शाहांना मातोश्रीवर दिवाळीच्या फऱाळासाठी जावंच लागेल, अशी सध्या तरी चिन्हं आहेत.