Ashadhi Padharpur Wari 2023: अखंड महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या पंढरपुरच्या विठुरायाची भेटीची आस वारकऱ्यांना लागली आहे. पंढरपूर आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर झाल्यांनतर आता प्रशासन देखील तयारीला लागले आहे. पंढरपूर आषाढी यात्रेसाठी जादा बस वाहतुकीचा व्यवस्था करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी तब्बल 5 हजार विशेष बसेस सोडणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता वारकऱ्यांसाठी राज्यभरातून पाच हजार विशेष बसेस सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. 25 जुन ते 5 जुलै या दरम्यान या विशेष बसेस धावणार आहेत. वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी 27 जुन रोजी 200 अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. हजारो वारकरी एसटीने जातात विठूरायाच्या दर्शनाला जातात. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती येथून बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी सुमारे पाच हजार बसेस सोडण्याचे नियोजन एसटी तर्फे करण्यात आले आहे. औरंगाबादयेथून 1200, मुंबई 500, नागपूर 100, पुणे 1200, नाशिक 1000 तर अमरावती येथून 700 अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान,यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय,संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.