मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणात (Mumbai Drugs Case) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) जामीन मंजूर केला आहे. गेल्या 25 दिवसांपासून आर्यन खान जेलमध्ये बंद आहे. उद्या किंवा परवा आर्यन खानची जेलमधून सुटका होईल. पण कोर्टाने आर्यन खानला जामीन दिला असला तरी त्याच्या समोर काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत. जेलमधून बाहेर आल्यानंतर आर्यन खानला या अटींचं पालन करावं लागणार आहे.
1 - आर्यन खानला आपला पोसपोर्ट कोर्टात जमा करावा लागणार आहे
2 - साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा किंवा पुराव्याशी छेडछाड करण्याचा कोणताही प्रयत्न करू नये
3 - आर्यन खानने सहआरोपींशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संभाषण करण्याचा कोणताही प्रयत्न करू नये
4 - बृहन्मुंबईतील एनडीपीएसच्या विशेष न्यायाधीशांच्या पूर्वपरवानगीशिवाय आरोपी देश सोडून जाऊ शकत नाही
5. आरोपींना दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत एनसीबी मुंबई कार्यालयात हजर राहावे लागेल
आर्यन खानबरोबरच सहआरोपी अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही जामीन देण्यात आला आहे. आर्यनच्या वकिलांनी रोख जामीन देण्याची परवानगी मागितली, पण कोर्टाकडून ती फेटाळण्यात आली. आर्यनच्या वकिलांची टीम आता शुक्रवारपर्यंत त्याच्या सुटकेची औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. 23 वर्षीय आर्यन सध्या न्यायालयीन कोठडीत मध्य मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहे.
आर्यन, अरबाज आणि मुनमुन यांना एनसीबीने 3 ऑक्टोबरला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलमांतर्गत अंमली पदार्थ बाळगणे, सेवन करणे, प्रतिबंधित अंमली पदार्थांची खरेदी-विक्री आणि कट रचणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.