'बरं झालं आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला'

भाजपचे काही आमदार पक्ष सोडणार असल्याचे वृत्त शेलार यांनी साफ फेटाळून लावले.

Updated: Dec 5, 2019, 06:36 PM IST
'बरं झालं आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला'

मुंबई: भाजपमधील डझनभर आमदार फुटणार असल्याचे वृत्त धादांत खोटे असल्याचा खुलासा आशिष शेलार यांनी केला. ते गुरुवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपचे काही आमदार पक्ष सोडणार असल्याचे वृत्त साफ फेटाळून लावले. महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होऊन आठ दिवस उलटले तरी खातेवाटप होऊ शकलेले नाही. अपक्ष आमदारांना दिलेली आश्वासने त्यांना पूर्ण करता येत नाहीयेत. त्यामुळे तिघाडीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता लपवण्यासाठीच त्यांच्याकडून भाजपच्या नावाने उलट्या बोंबा मारल्या जात असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली. 

भाजपमध्ये आधीपासून असलेले किंवा नव्याने आलेले आमदार पक्षाची शिस्त पाळणारे आहेत. त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच सत्तास्थापनेच्या आधी आम्हाला इतरांप्रमाणे आमदारांना डांबून ठेवावे लागले नाही. तर दुसरीकडे महाविकासआघाडीने आपल्या आमदारांना डांबून ठेवले. त्यांना मोठमोठी आश्वासने देण्यात आली. मात्र, आता प्रत्यक्षात काहीच घडत नाही. ही परिस्थिती पाहून आमच्याकडे आलेले आमदार 'बरे झाले आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला', असे म्हणत आहेत. त्यामुळे महाविकासआघाडीनेच आपल्या आमदारांच्या मनात काय चालले आहे, याचा कानोसा घ्यावा, असे शेलार यांनी म्हटले. 

दरम्यान, भाजपमधील ओबीसी फळी पक्षावर नाराज असल्याचा प्रकार कालच समोर आला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ही नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वाला डावलले जातेय, ही परिस्थिती दुर्दैवाने खरी आहे. पक्षातील नाराजांची मोट बांधावी लागत नाही, ते आपोआप एकत्र येतात, असे सूचक विधानही यावेळी खडसे यांनी केले होते.