Baba Siddique Murder Case : महाराष्ट्राच्या राजकाराणाला हादरा देणारी घटना नुकतीच घडली आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघालं. 12ऑक्टोबरला महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि तीन वेळा आमदारपद भूषवलेल्या बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सदह हत्येनंतर पोलीस यंत्रणांनी तातडीनं तपास सुरु करत आरोपींना बेड्या ठोकल्या आणि त्यानंतर लगेचच धक्कादायक माहिती उघड झाली.
लॉरेन्स बिष्णोई गँगचा या हत्येमागं हात असल्याची बाब समोर आली. एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून असा दावाही करण्यात आला. सदर घटनेतील आरोपी पोलीस कोठडीत असतानाच आता पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील लग्नाच्या वरातीत गोळीबार करण्याच्या प्रथेतून कशा पद्धतीनं बिष्णोई गँगला त्यांचा शार्पशूटर सापडला याची माहिती समोर आली.
सिद्दीकींच्या हत्येप्रकरणात फरार असणाऱ्या आरोपी शिवकुमार गौतम यानं काही प्रसंगी गावातील लग्नसोहळ्यांमध्ये वरातीत गोळीबार केला होता, हेच पाहून त्याला बिष्णोई गँगनं शिवकुमारचा गँगमध्ये सामील करून घेतला होता. पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार हे आरोपी स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संवाद साधत होते. दरम्यान या शिवकुमारनं सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे.
सिद्दीकी यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढक असतानाच पोलिसांनी पकडलेल्या आरोपीकडून पिस्तुल हस्तगत करण्यात आलं. पण, फरार झालेल्या आरोपीनं मात्र पिस्तुल भिरकावून दिल्यामुळं तपासात अडचणी आल्या. अखेर हे पिस्तुलही पोलिसांना सापडलं. पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणारे आरोपी कुर्ल्यातील पोलीस पटेल चाळीत राहत होते. इथं राहण्यासाठी ते 14 हजार रुपये इतकं भाडं मोजत होते. याच घराच्या परिसरात आरोपींची MH 17 AP 2972 क्रमांकाची दुचाकी पार्क असल्याचंही सांगितलं जात आहे.