बाळासाहेब म्हणतात... 'माझा फोटो वापरलात तर रॉयल्टी द्यावी लागेल''

शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' नाव, द्यावी लागणार रॉयल्टी?

Updated: Oct 11, 2022, 05:14 PM IST
बाळासाहेब म्हणतात... 'माझा फोटो वापरलात तर रॉयल्टी द्यावी लागेल''  title=

ShivSena Symbole : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटासाठी (Shinde Group) नाव जाहीर केली आहेत. उद्धव ठाकरे गटासाठी 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) नाव देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' (Balasaheb Shivsena) हे नाव देण्यात आलं आहे. तसंच उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देखील देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाने चिन्हांसाठी तीन पर्याय दिले आहेत. 

शिंदे गटाकडून नावांचे तीन पर्याय
शिंदे गटाकडून (Shinde Group) तीन नावाचा प्रस्ताव देण्यात आला होता. आपल्या पक्षाच्या नावात बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.  यात
१. बाळासाहेब ठाकरे 
२. बाळासाहेबांची शिवसेना
३. शिवसेना बाळासाहेबांची
अशा तीन नावांचा पर्याय देण्यात आला होता. यापैकी दुसरा म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलं आहे. 

सोशल मीडियावर ट्रोल
शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर (Social Media) ट्रोल केलं आहे. याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यासह तीन जणांना 'बाळासाहेब' या नावाने ओळखलं जातं. यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (बाळासाहेब) (Prakash Ambedkar) या नेत्यांचा समावेश आहे.

बाळासाहेब थोरात म्हणतात
नेटकऱ्यांनी बाळासाहेब थोरात आणि प्रकाश आंबेडकर यांच्या फोटोसह बाळासाहेबांची शिवसेना असं लिहून सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. व्हायरल होणाऱ्या या फोटोवर बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. माझा फोटो लावला तर शिंदे गटाकडून रॉयल्टी घ्यावी लागेल असं बाळासाहेब थोरात यांनी गमतीने म्हटलं आहे. तसंच आम्ही महाविकास आघाडी म्हणून पोट निवडणूकित उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत असल्याचंही बाळासाहेब थोरांत यांनी म्हटलंय.

किशोरी पेडणेकर यांचा टोला
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही टोला लगावला आहे. ठाकरे नाव आल्याशिवाय बाळासाहेब परिपूर्ण होत नाही, त्यामुळे ती शिवसेना कुणाची याचं उत्तर शिंदे गटाला द्यावं लागेल, असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.