आज उच्च न्यायालयात लागणार 'डॉल्बीचा निकाल'

डीजे आणि साऊंड सिस्टीमची गोदामे गणेशोत्सवपर्यंत बंद राहणार?

Updated: Sep 19, 2018, 10:19 AM IST
आज उच्च न्यायालयात लागणार 'डॉल्बीचा निकाल' title=

मुंबई : गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डीजे अथवा डॉल्बी वाजणार की नाही? याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. दरवर्षी गणेशोत्सवा दरम्यान विसर्जन मिरवणुकांमधील मोठ मोठे डीजे वाजवले जातात. त्याने मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतं. मात्र यंदा राज्यभरात अनेक ठिकाणी पोलिसांनी नोटिसा पाठवून डीजे आणि साऊंड सिस्टीमची गोदामे गणेशोत्सवपर्यंत सील केली होती.

ऐन सणासुदीच्या दिवसांत पोलिसांकडून अशाप्रकारे कारवाई होत असल्याने आणि अघोषित बंदी घातली जात असल्याने साऊंड सिस्टीम चालक-मालकांची संघटना असलेल्या प्रोफेशनल ऑडिओ अॅन्ड लायटिंग असोसिएशनने (पाला) उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

गेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने साऊंड सिस्टिम मालकांना तात्पुरता दिलासा देण्यास नकार दिला होता. सण-उत्सव येत रहातील पण त्यातून होणाऱ्या गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून दुर्लक्ष करू शकत नाही, असंही न्यायालयाने म्हटलं होतं.