पूल दुर्घटना : मुंबई पालिका मुख्यालयात पत्रकारांना येण्यास बंदी, अधिकाऱ्यांचा पळ

मुंबई महापालिकेने पहिल्यांदाच पालिका मुख्यालयात पत्रकारांना येण्यास बंदी घातली.  

Updated: Mar 15, 2019, 06:28 PM IST
पूल दुर्घटना : मुंबई पालिका मुख्यालयात पत्रकारांना येण्यास बंदी, अधिकाऱ्यांचा पळ  title=

मुंबई : मुंबई महापालिकेने पहिल्यांदाच पालिका मुख्यालयात पत्रकारांना येण्यास बंदी घातली. इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या पत्रकारांना कॅमेरा आत घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला. हिमालय पादचारी पूल दुर्घटनेबाबत बोलण्यापासून अधिकारी पळ काढत आहेत. माध्यमांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागू नये म्हणून ही बंदी घातली की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनीही माध्यमांना बघून पळ काढला. विजय सिंघल यांच्याकडे रस्ते आणि पूल यांची जबाबदारी आहे. सिंघल यांनी माध्यमांवरील राग आपल्या अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांवर काढला. आयुक्त अजोय मेहतांनी तर त्यांच्या दालनाकडे जाणारे सगळे रस्ते बंद करत कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली. मात्र माध्यमांनी टीकेची झोड उठल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रवेश देण्यात आला. 

या ठिकाणी वाहतूक बंद तर या ठिकाणाहून वळवली

सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पादचारी पुलाचा काही भाग गुरूवारी कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला. पुलाच्या दुर्घटनेनंतर पालिकेनं रस्त्यावर कोसळलेल्या पुलाचे अवशेष तातडीने हलवले. तसंच पुलाचा धोकादायक स्लॅब देखील जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आला. या दुर्घटनेनंतर जे. जे. पुलाची उत्तर वाहीनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. उत्तरेकडे जाणारी मार्गिका पूर्णपणे बंद तर दक्षिणेकडून येणारी वाहतूक एम.आर.ए. मार्ग पोलीस ठाण्याकडून मेट्रोच्या दिशेने वळवण्यात आलीय. उत्तरेकडे जाण्यासाठी मोहम्मद अली रोड, पी डीमेलो रोड आणि मरीन ड्राईव्हचा पर्यायी मार्ग आहे. सीएसएमटीवरून दादरकडे जाणाऱ्या गाड्यांना महापालिका मार्गावरून मेट्रो जंक्शन आणि तिथून मोहम्मद अली मार्गाने दादरकडे वळवण्यात आली आहे.

शासकीय यंत्रणांच्या बेफिकीर  

सीएसएमटी स्थानकाबाहेरील पूल दुर्घटनेनंतर मुंबईकर हवालदिल झाले आहेत. मुंबईत कुठेही कधीही तुमचा आमचा मृत्यू होऊ शकतो, अशी त्यांची भावना झालीय. दहशतवादाच्या नेहमीच सावटाखाली असणारी मुंबई आता प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणांच्या बेफिकीर कारभाराच्या दहशतीत आहे. एलफिन्स्टन, अंधेरी या पुलांच्या दुर्घटनेतून प्रशासनाने काहीच धडा घेतला नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. सरकारी यंत्रणा एवढ्या निगरगट्ट झाल्या आहेत की काही दिवसांत सगळं विसरलं जाईल याची त्यांना खात्री आहे. त्यामुळेच मग परत परत एलफिन्स्टन, अंधेरी, सीएसएमटी.. घटना घडतच राहतात... फक्त मृतांचे आकडे बदलतात, अशी संतप्त प्रतिक्रीया सामान्यांकडून व्यक्त होत आहेत.