मुंबई महापालिका निवडणूक लागलेली नाही, त्याआधीच शिवसेना-भाजप आमने-सामने का?

मुंबई महापालिकेच्या (Mcgm Election 2021) निवडणुकीला अजून आठ महिन्यांचा कालावधी बाकी आहे. 

Updated: Jun 2, 2021, 07:47 PM IST
मुंबई महापालिका निवडणूक लागलेली नाही, त्याआधीच शिवसेना-भाजप आमने-सामने का? title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिकेच्या (Mcgm Election 2021) निवडणुकीला अजून आठ महिन्यांचा कालावधी बाकी आहे. मात्र आतापासूनच राजकीय वातावरण तापू लागलंय. याला कारणही तसंच आहे. सत्ताधारी शिवसेनेने घेतलेल्या एका निर्णयावरुन भाजपने आक्षेप नोंदवला आहे. भाजपचं आक्षेप नोंदवण्याचं मुख्य कारण म्हणजे (ward Reconstruction) वॉर्ड पुनर्रचना. ज्यांच्या हाती सत्ता असते ते त्यांच्या सोयीप्रमाणे वॉर्ड पुनर्रचना करतात आणि काही जागा सेफ करतात. मागील वेळेस भाजपनं (BJP) केले आणि यावेळी शिवसेना (Shivsena) करणार आहे. (bjp give Objection on shivsena ward Reconstruction before mcgm election 2021) 

तीन दशकांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. शिवसेनेला मुंबईतील सत्तेमुळंच राज्यात हातपाय पसरण्यासाठीची आर्थिक ताकद मिळालीय. त्यामुळं मुंबई पालिका ही शिवसेनेचा प्राण आहे. फेब्रूवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्याचे पडघम आतापासूनच वाजू लागलेत. भाजपनं २०१७ च्या पालिका निवडणुकीत सत्तेत असलेल्या मनाजोगी आणि सोयीस्कर वॉर्ड पुनर्रचना करून अर्धे मैदान जिंकले होते.

त्यावेळी भाजपनं आधीपेक्षा दुप्पटीहून जागा जिंकल्या होत्या. आता शिवसेनेची ही वॉर्ड पुनर्रचना करून काही जागा सेफ करण्याची वेळ आहे. त्यामुळं या वॉर्ड पुनर्रचनेच्या विरोधात आतापासूनच भाजपनं आक्षेप घ्यायला सुरुवात केलीय. यावरुन भाजप आमदार आशिष शेलारांनी टीका केली आहे. "सत्ताधारी शिवसेना आणि महाभकास आघाडी मुंबई महापालिकेला दोन वर्ष मुदतवाढ देण्याचा प्रयत्न केला जातोय. 30 वॅार्ड जे आजन्म शिवसेना आणि काँग्रेसला जिंकताच येणार नाहीत अशा ठिकाणी फोडाफोडी करण्याचा प्रयत्न सुरूय", असं शेलारांनी म्हटलंय. 

शिवसेनेबरोबरच काँग्रेसलाही वॉर्ड पुनर्रचना करायचीय. भाजपनं गेल्या निवडणुकीत सुमारे 45 वॉर्ड आपल्या सोयीच्या दृष्टीने बदलून घेतले होते आणि त्यामुळंच भाजपला अधिक यश मिळाल्यानं किमान या 45 वॉर्डची रचना बदलण्याची मागणी काँग्रेसनं केलीय. तर शिवसेना कधीही भाजपशी दोन हात करण्यासाठी तयार असल्याचे म्हटलंय.

राज्य निवडणूक आयोगानेही नियोजीत वेळेत निवडणूक घेण्याच्या दृष्टीने तयारीचे आदेश दिलेत. या तयारीत वॉर्ड पुनर्रचनाही आहे. जी येत्या काळात आणखी चर्चेत राहणार आहे. प्रत्यक्ष लढाईला अजून 8 महिन्यांचा कालावधी असला तरी आपल्या दृष्टीने सोयीस्कर आणि सुरक्षित मैदान कसं राहिल, या प्रयत्नात सर्वच राजकीय पक्ष आहेत.

संबंधित बातम्या : 

भेटी लागी जीवा | यंदा आषाढीवारी निघणार की यंदाही खंडीत होणार?

मिळणार लाखोंचं बक्षिस फक्त, तुमचं गाव करा कोरोनामुक्त - ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा