मुंबई : महाराष्ट्रामध्ये सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. कळंबोली येथे पोलिसांना मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला आहे. त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांची गाडी पेटवली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार देखील केला आहे. तर काही ठिकाणी बसची तोडफोडही करण्यात आली. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातलं वातावरण तापलं असतानाच मुख्यमंत्री बदलले जाऊ शकतात अशी भाजपमध्ये चर्चा असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. नेतृत्व बदलायचं का नाही याचा निर्णय भाजपनं घ्यावा. उद्धव ठाकरे यांनी सावज दमलंय हे विधान केलंय, त्याचा अर्थ तुम्हाला येत्या आठवड्याभरात कळेल, असं सूचक वक्तव्य राऊत यांनी केलं आहे.
राजकीय पडद्यावरून सरकार गायब आहे हे अतंत्य दुर्दैवी आहे. सरकारनं बघ्याची पळपुटी भूमिका घेऊ नये, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेनं या आंदोलनातलं पहिलं बलिदान शिवसेनेचं आहे. या बलिदानातून हे आंदोलन पेटलं आहे. आरक्षणाच्या भूमिकेला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. सरकारनं उठसूठ कोर्टाचं कारण देऊ नये. राम मंदिराबाबतही सरकार तेच कारण देतंय, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
सरकारनं हे गांभीर्यानं घेतलं नाही तर त्याची किंमत चुकवावी लागेल. सरकारनं काकासाहेब शिंदेंचं बलिदान व्यर्थ जाऊन देऊ नये. शरद पवार यांच्या बोलण्यात तथ्य आहे. हे सगळ्यांचंच राजकीय अपयश आहे. अशा आंदोलनांना त्या राज्यातलं नेतृत्व असतं. विरोधी पक्षात असताना तुम्ही यावरच आंदोलनं केली होती, असं राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सापाच्या वक्तव्यामुळे राज्यात संताप आहे, अशी टीका राऊत यांनी केली.