मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाला हरवल्यानंतर राज्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करु, असे सांगितले. हा म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला जाण्यासारखा प्रकार असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाची स्थिती, आर्थिक पॅकेज, लॉकडाऊन आणि विरोधकांचे राजकारण या मुद्द्यांवर सविस्तरपणे भाष्य केले.
यावेळी त्यांनी सध्या कोरोनाचा सामना करणे हा प्राधान्यक्रम असल्याचे सांगितले. त्यामुळे आता आरोग्य सुविधा देतो, नंतर आर्थिक पॅकेज देईन, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
केंद्राचं पॅकेज ते राज्यातलं राजकारण, मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा आशिष शेलार यांनी ट्विट करून समाचार घेतला. शेलार यांनी म्हटले की, मुख्यमंत्री आधी कोरोनाला हरवणार मग पॅकेज देणार म्हणतात. आमच्या कोकणी भाषेत याला मेल्यावर पाणी पाजायला जाणे म्हणतात. मग तुम्ही विरोधी पक्षात होतात त्यावेळी शेतकऱ्यांना पॅकेज द्या अशी मागणी करायचात, ते काय होते? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. तसेच आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांचे भाषण आणि दिशा दररोज बदलत असल्याचाही टोला लगावला. एकदा म्हणता महाराष्ट्राला पावसाळ्यापूर्वी कोरोनामुक्त करु. एकदा म्हणता केंद्राच्या पथकाने आकडेच दिले नाहीत. आता म्हणता, पथकाने दिले त्यापेक्षा कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची दिशा दररोज बदलत असल्याची टीका शेलार यांनी केली.
अडचणीत आलेला शेतकरी, बारा बलुतेदार, महिला बचत गट, छोटा उद्योजक, विद्यार्थी, कामगार,आणि मुंबईकर, करदाते ..यांना काही तरी मदत करावी असे वाटत नाही का?
हॉस्पिटल मध्ये रुग्णांना घेतले जात नाही..रुग्णवाहिका, खाटा नाहीत..निष्पाप जीव जात आहेत.नुसते भाषण नको..आता तरी करुन दाखवा! 4/4
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 24, 2020
केंद्राचं पॅकेज ते राज्यातलं राजकारण, मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा
तसेच विरोधक राजकारण करत असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आरोपालाही शेलार यांनी प्रत्युत्तर दिले. राजकारण करु नका हे नेमकं कुणाला सांगताय? संजय राऊत आणि जयंत पाटील खासगीत ऐकत नाहीत म्हणून असे सार्वजनिक सांगताय का? काय चाललंय कळालयाच मार्ग नाही, असे शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.