Chandrakant Patil : भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या झी 24 तासवरील मुलाखतीतल्या विधानानं राज्यातलं राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अयोध्येत बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात (Demolition of the Babri Masjid) एकाही शिवसैनिकाचा (Shivsainik) सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. झी 24 तासचे संपादक निलेश खरे यांनी 'ब्लॅक अॅण्ड व्हाइट' या कार्यक्रमात घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये चंद्रकांत पाटलांनी हे विधान केलं होतं.
चंद्रकांत पाटील यांची सारवासारव
या बाबरी वक्तव्यावरुन राजकारण तापल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. 'बाळासाहेबांवर श्रद्धा, अपमानाचा प्रश्नच नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) सांगितल्यामुळे पत्रकार परिषद घेतली तसंच उद्धव ठाकरेंना फोन करून गैरसमज दूर करु असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात कायमच श्रद्धा राहिली आहे. बाळासाहेबांमुळे हिंदुत्ववादी विषयांना चालना मिळाली. बाळासाहेबांमुळे मुंबईतला हिंदू जिवंत राहिला. बाळसाहेबांबद्दल बोलताना मी नेहमीच ऋण व्यक्त केलं आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
विहिपच्या नेतृत्वात आंदोलन
बाबरी ढाचा पाडण्याचा म्हणजे अयोध्येत रामजन्मभूमी आहे हे प्रस्तापित करण्याचं आंदोलन 1983 पासून सुरु झालं. हे आंदोलन विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली सुरू झालं. ढाचा पाडला ती तिसरी वेळ होती. त्याआधी दोनवेळा कूच झाली होती. ती सदासर्वकाळ विहिपच्या नावाने झाली. शिवसैनिक आहेत की नाही असा भेद नव्हता. सर्व हिंदू होते. हे सर्व जणं विहिपच्या बॅनरखाली होते असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं.
शिवसेनेचा बाबरी ढाचा पाडण्याचा संबंध नव्हता का? असा प्रश्नच नाही सतीश प्रधानांपासून अनेक मंडळी होती. आनंद दिघेंनी सोन्याची वीट पाठवली होती. प्रत्यक्ष ढाचा पाडताना शिवसैनिक होते का, तर तसं नव्हतं, ते हिंदूंनी पाडलं आणि नेतृत्व होतं ते विहिपचं होतं, असं माझं म्हणणं होतं, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.
उद्धव ठाकरेंना फोन करणार
मातोश्रीशी आपण नेहमीच संपर्कात राहिलो, आम्हाला बाळासाहेबांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. आमच्या परिसरात दंगल झाली तर शिवसैनिक पंधरा-पंधरा दिवस सुरक्षित ठेवायचे. माझं प्रश्न असा होता की संजय राऊत कुठे होते. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचं काम नेहमीच होतो. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केला हा आरोप मी सहन करणार नाही. मातोश्रीबद्दल जसा आदर आहे तसाच उद्धव ठाकरेंबद्दलही आहे. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषदेत जे काही आरोप केले त्याबद्दल मी प्रतिक्रिया देणार नाही. त्यांना फोन करुन चर्चा करणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.