Uddhav Thackeray on Chandrakant Patil : लपलेले उंदीर आता बाहेर आले आहेत. बाबरी पाडली तेव्हा सर्व उंदीर लपलेले होते. बाबरी पाडली तेव्हा बरेच उंदीर पळाले, असे सांगत बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला. बाबरी शिवसैनिकांनीच पाडल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केला. भाजपकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न आहे. आता हे मिंधे काय करणार आहेत. भाजपचे तळवे किती दिवस चाटणार आहात. आता स्वत:चे थोबाड कोणत्या जोड्याने फोडून घेणार आहात?, असे विचारत चंद्रकांत पाटली यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला पाहिजे, नाही तर मुख्यमंत्र्यांनी स्वत: राजीनामा दिला पाहिजे, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मांडली.
1992 च्या डिसेंबर महिन्यात बाबरी मशीद पाडण्यावरुन निर्माण झालेला वाद पुन्हा एकदा समोर आलाय. भाजपा नेते आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'झी 24 तास' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवा दावा केला. बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता असा खळबळजनक दावा केला होता. 'झी 24 तास'च्या 'ब्लॅक अँड व्हाईट' या विशेष कार्यक्रमातल्या मुलाखतीत केला. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून भाजपावर टीकास्र सोडण्यात आले आहे. खासदार संजय राऊत यांनी सकाळीच जोरदार हल्लाबोल चढवला होता. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
जे मिंधे आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडला म्हणून सत्तेसाठी पाय चाटायला भाजपसोबत गेले. आता त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा किंवा स्वतः मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. कारण बाळासाहेब ठाकरे यांचा अपमानच भाजपने केला आहे. मी त्यावेळी लखनऊ तुरुंगात शिवसैनिकांना भेटायला गेलो होतो. आता अयोध्येत राम मंदिरात दर्शनसाठी दुनिया जाते आहे. आम्ही जेव्हा अयोध्येत जात होतो तेव्हा राम मंदिराचा प्रश्न बासनात गुंडळाला होता. राम मंदिर बांधण्याचं काम होते आहे. कारण कोर्टाने हा निर्णय दिला. त्यासाठी विशेष कायदा हा मोदी यांनी केलेला नाही, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, आताचे पंतप्रधान हे हिमालयात गेले असावेत. कारण त्यांचेही नाव समोर आले नव्हते. संतापजनक गोष्ट ही आहे की जेव्हा बाबरी पाडली तेव्हा हे सगळे उंदीर बिळात लपून बसले होते. कुणीही बाहेर यायला तयार नव्हता. सुंदर सिंह भंडारी यांनी अंगलट काही यायला नको म्हणून जाहीर केले होते की बाबरी पाडण्यात शिवसैनिकांचा सहभाग होता. ही बातमी आली तेव्हा मी स्वतः हजर होतो. संजय राऊत यांचा फोन आला होता. बाळासाहेबांना मी सांगितलं की बाबरी पाडली. बाबरी पाडल्यावर बाळासाहेबांना फोन आला होता. त्यावेळी ते म्हणाले जर शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला अभिमान आहे. बाळासाहेबांनी फोन ठेवला आणि म्हणाले हे कसलं नपुंसक नेतृत्व? असं नेतृत्व असेल तर हिंदू उभा राहणार नाही.
दरम्यान, राम जन्मभूमीच्या आंदोलनात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची मोठी भूमिका आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य हे त्यांची व्यक्तिगत मत भाजपची भूमिका नाही, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.