भाजपकडून नाराजी दूर, माधव भंडारी यांना मंत्रीपदाचा दर्जा

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलाय. 

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 28, 2018, 08:16 AM IST
भाजपकडून नाराजी दूर, माधव भंडारी यांना मंत्रीपदाचा दर्जा  title=

मुंबई : भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलाय. माधव भांडारी यांची पुनर्वसन व पुनर्स्थापना सनियंत्रण समितीवर उपाध्यक्ष म्हणून शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे मंत्री पदाच्या सर्व सुविधा भंडारी यांना मिळणार आहेत. यापूर्वी दोन वेळा विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्याने भंडारी  नाराज होते. मंत्रीपदाचा दर्जा असलेले पद देऊन भंडारींची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जातेय.

दरम्यान, माधव भंडारी यांना विधान परिषदेवर पाठविले जाणार, अशी चर्चा होती. मात्र, त्यांचा पत्ता यावेळी कापण्यात आला. तर दुसरीकडे भाजपकडून ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना भाजपच्या  कोट्यातून राज्यसभेवर पाठविण्यात आले. मात्र, माधव भंडारी यांच्या नावाचा उल्लेख होत नसल्याने ते नाराज होते. भाजपच्या स्थापनेपासूनचे निष्ठावान कार्यकर्ते अशी माधव भंडारी यांची ओळख आहे.  

माधव भंडारी यांची काम काय असणार?

राज्य पुनर्वसन प्राधिकरणाची शासनाने पुनर्रचना केली. मदत व पुनर्वसन मंत्री हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष तर भंडारी हे उपाध्यक्ष असतील. महसूल, वित्त, जलसंपदा, उद्योग, ऊर्जा व वनमंत्री हे या समितीचे सदस्य असतील.राज्य शासनाच्या कोणत्याही प्रकल्पामुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनाची कामे या प्राधिकरणामार्फत करण्यात येतील. पुनर्वसनासंबंधी नियम करणे आणि धोरणात्मक निर्णय घेण्याचे काम हे प्राधिकरण करेल. पुनर्वसनासंदर्भात आर्थिक व प्रशासकीय निर्णय घेणे, त्यासाठी संबंधित यंत्रणेला निर्देश देणे व घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे काम प्राधिकरण करेल.