'शिवसेनेच्याच शुद्धीकरणाची गरज' भाजप नेत्यांचा जोरदार हल्लाबोल

स्मृतीस्थळ शुद्धीकरणाच्या मुद्दयावरुन राज्यात नवा राजकीय वाद उभा राहण्याची शक्यता

Updated: Aug 19, 2021, 09:27 PM IST
'शिवसेनेच्याच शुद्धीकरणाची गरज' भाजप नेत्यांचा जोरदार हल्लाबोल title=

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपासून मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट देऊन राणे यांनी अभिवादन केलं. पण, यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं. त्यामुळे या मुद्द्यावरून राज्यात नवा राजकीय वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

शिवसैनिकांनी स्मृतीस्थळांचं शुद्धीकरण केल्यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. भाजपचे आमदार आशिष शेलार, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर यांनीही शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेचं शुद्धीकरण करण्याची गरज

सत्तेच्या लालसेपोटी सोनिया गांधींच्या नावाने शपथ घेऊन काँग्रेस बरोबर सलगी केलेल्या आणि स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जेलमध्ये टाकलेल्या छगन भुजबळांबरोबर सत्तेच्या लालसेपोटी सलगी करणाऱ्या शिवसेनेचीच शुद्धीकरण करण्याची गरज झाली आहे. अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

'शिवसैनिकांची कृती योग्य नाही'

प्रत्येकाचं श्रद्धास्थान असतं आणि श्रद्धास्थान पक्षाच्या चौकटीत, व्यक्तीच्या चौकटीत, घराच्या चौकटीत, जातीच्या चौकटीत बांधता येत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी राणेंसाहेबांना घडवलं, त्यामुळे दर्शन घेण्याचा विषय प्रतिष्ठेचा करण्याचं कारण नव्हतं, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. बाळासाहेब हे काही कुणाची खासगी मालमत्ता नाहीत. ज्याला आपण दैवत मानतो त्या व्यक्तीला तुम्ही विभागू शकत नाही. शिवसैनिकांची ही कृती योग्य नाही, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

भातखळकरांचा शिवसेनेवर हल्लाबोल

भाजप नेते अतुल भातखळकर यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनाप्रमुखांना राहुल गांधी आदरांजली वाहत नाहीत, तरी त्यांच्या मांडीवर बसता. शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्या लखोबाच्या गळ्यात गळे घालता. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर ज्यांचा उद्धार केला त्या सोनिया मातोश्रींना मुजरे करता. उद्धवजी शुद्धीकरण खरेतर शिवसेनेचे करण्याची गरज आहे, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.