मुख्यमंत्री म्हणतात, भाजपला सोडलं म्हणजे 'ते' सोडलं असं नाही.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सातत्याने शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजप आणि मनसेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडे बोल सुनावलेत.  

Updated: Apr 10, 2022, 06:38 PM IST
मुख्यमंत्री म्हणतात, भाजपला सोडलं म्हणजे 'ते' सोडलं असं नाही.   title=

मुंबई : शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणली. मात्र, ही युती तोडण्यासाठी कोण जबाबदार आहे? 2014 ला युती तुम्ही तोडली. एकनाथ खडसे यांचा फोन आला.. आपण वेगळे लढलं पाहिजे असं सांगण्यात आलं. सुरवात कुणी केली? अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

कोव्हिड काळात मुंबईमध्ये एकही काम विदाऊट टेंडर  केलं नाही. मोदींनी रेशन दिलं हे खरं आहे. पण, हे रेशन कच्च खायचं का? गॅस किती महागला आहे. जेवण कसं शिजवायचे? आमच्या हक्काचे GST परतावा देखील देत नाहीत. राज्याच्या हितासाठी आम्ही आघाडी केली. आपत्तीचे डोंगर डोक्यावर घेवून काम करतोय. पण, आम्ही थांबलो नाही, असे ते म्हणाले.

सीमा भागातील मराठी बांधावर अन्याय अत्याचार केला जातो. त्यावेळी भगव्याच्या रक्षणासाठी किती भाजपवाले रस्त्यावर उतरले? बेळगाव महानगरपालिकेवर असणारा भगवा काढला. तिथं खोटा भगवा लावला. कर्नाटकमध्ये शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केली. त्यावेळी भाजपवाल्यांनी काय केलं? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

 

2019 ला भाजप आपल्यासोबत होती. तरीही शिवसेनेच्या उमेदवाराची मते वाढली नाहीत. तुमची मते पंचगंगेत बुडाली का. तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व  सोडलं असं नाही. तुम्ही म्हणजेच हिंदुत्व असं काही नाही. अस्सल भगवा हा शिवाजी महाराज आणि साधुसंत यांचा आहे. आम्ही पण शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत. जर का कोणी गद्दारी केली ते आम्ही खपवून घेत नाही असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

देशात हिंदुहृदयसम्राट असं एक बनावट नाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण, तो लोकांनी हाणून पाडलं. आता भाजपने 'हिंदुहृदयसम्राट' यांच्या नावांमध्ये जनाब असं लावण्याचा प्रयत्न केला. आता यांचा नकली बुरखा फाडायलाच पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.