उद्धव ठाकरे -अमित शाह यांच्या भेटीत याची चर्चा, शिवसेनेकडून हे आश्वासन?

आगामी निवडणुकीसाठी युतीबाबत शिवसेना सकारात्मक असल्याची माहिती भाजप सूत्रांकडून सांगण्यात आलेय.  

Updated: Jun 6, 2018, 11:29 PM IST
उद्धव ठाकरे -अमित शाह यांच्या भेटीत याची चर्चा, शिवसेनेकडून हे आश्वासन? title=

मुंबई : आगामी निवडणुकीसाठी युतीबाबत शिवसेना सकारात्मक असल्याची माहिती भाजप सूत्रांकडून सांगण्यात आलेय. दरम्यान, लोकसभेसाठी शिवसेना-भाजप युती नक्की करु, असे शिवसेनेने भाजपला आश्वासन दिल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे बंद दाराआड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी सव्वा दोन तास झालेली चर्चा यशस्वी झाल्याचे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली. पुढील वर्षी होणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची भेट होत असल्याने प्रसारमाध्यमांमध्ये या भेटीविषयी प्रचंड उत्सुकता होती. सायंकाळी पावणे आठच्या दरम्यान अमित शाह मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस हे देखील अमित शाह यांच्यासोबत होते.

उद्धव - अमित शाह यांच्यात नेमके काय झाले?

दोन तासांत सकारात्मक चर्चा 

- अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात सव्वा दोन तासांत सकारात्मक चर्चा झाली

- आगामी निवडणुकीसाठी युतीबाबत सेना सकारात्मक - भाजप सूत्र

- लोकसभेसाठी युती नक्की करू शिवसेनेचे भाजपाला आश्वासन

- हिंदुत्ववादी विचार जिंकला पाहिजे, शिवसेनेचा भाजपाला  आग्रह

- दोन्ही कडील मतभेद बर्‍यापैकी दूर झाले आहेत

- अशा आणखी दोन - तीन बैठका घेण्याचं दोन्हीकडून मान्य

- मातोश्रीवरील चर्चेत युतीच्या दिशेने पहिले पाऊल

- पुढे अशा आणखी चर्चा करण्यास शिवसेनेने तयारी दर्शविली असल्याने स्वबळाच्या घोषणेपासून शिवसेना एक पाऊल मागे