वीज बिलांवरून भाजप आक्रमक, नितीन राऊतांविरोधात हक्कभंग आणणार

कोरोना लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आलेल्या वीज बिलांवरून भाजप आक्रमक झाली आहे.

Updated: Aug 28, 2020, 07:55 PM IST
वीज बिलांवरून भाजप आक्रमक, नितीन राऊतांविरोधात हक्कभंग आणणार title=

मुंबई : कोरोना लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आलेल्या वीज बिलांवरून भाजप आक्रमक झाली आहे. आगामी अधिवेशनात उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरुद्ध हक्कभंग आणणार असल्याचं भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितलं आहे. 

'जनतेला आलेल्या अवास्तव वीज बिलात सवलतीची घोषणा ठाकरे सरकारने केली, पण त्यासाठी लागणारे १ हजार कोटी रुपये देण्यास वित्त विभागाने नकार दिला. हा निर्णय म्हणजे सरकारचे लबाडाघरचे आवतान ठरला. या फसवणुकीविरोधात उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणणार,' असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. 

सरकारचं वीज कंपन्यांशी साटलोटं असल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे. उर्जामंत्र्यांनी फसवी घोषणा केल्याबद्दल व यासंदर्भात लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय केला जाणार असल्याचं खोटं सांगितल्याबद्दल उर्जामंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार असल्याचं अतुल भातखळकर म्हणाले आहेत. 

शालेय विद्यार्थ्यांच्या फीबाबतीत राज्य सरकारने जशी फसवणूक केली, तेच सरकारने वीज बिलाबाबतीत केलं आहे. हा प्रकार म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळणं आहे, अशी टीका भातखळकर यांनी केली. तसंच ३०० युनिटपर्यंत वीजबील माफ केल्याशिवाय भाजप शांत बसणार नाही, असा इशाराही अतुल भातखळकर यांनी दिला आहे.