Mumbai Plastic Ban News: मुंबई महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांविरोधात कठोर धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेने यासाठी 5 सदस्यांचं विशेष पथक स्थापन केलं आहे. या पथकाच्या माध्यमातून प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. म्हणजेच आता मुंबईमध्ये प्लास्टिकची पिशवी वापराणारी एखादी व्यक्ती या पथकाला आढळून आली तर अशा व्यक्तीला दंड ठोठावला जाईल. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचा 1 अधिकारी, पालिकेचे 3 अधिकारी आणि 1 पोलीस अधिकारी असं 5 जणांचं पथक स्थापन करण्यात येणार आहे. आज म्हणजेच 15 ऑगस्टपासून 24 प्रभागांमध्ये हे पथक गस्त घालणार आहे.
50 मायक्रॉनपेक्षा कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक पिशव्या दिल्यास 5 हजार रुपयांचा दंड आकाराला जाणार आहे. पहिल्यांदाच महापालिका ग्राहकांवर कारवाई करणार आहे. आतापर्यंत महापालिकेकडून दुकानदारांवर कारवाई केली जात होती. मात्र आता ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ग्राहकांकडूनही दंडवसुली केली जाणार आहे. महानगरपालिकेने प्लास्टिकविरोधी धोरण हाती घेतल्याने मुंबईकरांनी समाधान व्यक्त केलं आहे. मात्र त्याचवेळी थेट ग्राहाकांना या नव्या नियमांचा फटका बसणार असल्याने ग्राहकांकडून दंड आकरण्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.
दुकानदारांनीच प्लास्टिकच्या पिशव्या देऊ नयेत. त्यांनी पिशव्या दिल्या नाहीत तर ग्राहकांकडून त्यांचा वापर होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असं म्हणत ग्राहकांना उगाच भूर्दंड का असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे. तर काहींनी प्लास्टिकवर बंदी घालणं योग्य असलं तरी इतर पर्यायही उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सरकारचीच आहे असंही म्हटलं आहे. तर नागरिकांनी त्यांची जबाबदारी पार पाडावी असं प्रशासनाचं म्हणणं आहे.
दुसरीकडे दुकानदारांकडूनचं केवळ दंड आकारण्याच्या धोरणाला दुकानदारांचा विरोध आहे. अनेकदा भाजीपाला किंवा किराणामाल घेण्यासाठी आलेले ग्राहक पिशव्या आणत नाहीत. त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीची मागणी केली आणि ती नाकारली तर ग्राहक सामानच घेत नसल्याची दुकानदारांची तक्रार आहे. दुकानदारांनी आपण दुहेरी कोंडीत अडकल्याचं सांगत ग्राहकांनी खरेदीसाठी येताना कापडी पिशव्या आणण्याचं भान बाळगलं तरी अनेक समस्या निकाली निघतील असं दुकानदार सांगतात.
पावसाळ्यामध्ये मुंबईत पाणी तुंबण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतात. 1 जुलै 2022 ते 31 जुलै 2023 दरम्यान वर्षभरात प्लास्टिकविरोधी मोहिमेत मुंबईतील दुकानदारांकडून 79 लाख 15 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. या कालावधीमध्ये 5283 किलोहून अधिक प्लास्टिक जप्त करण्यात आलं आहे.