मुंबई : महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत सर्व परीक्षांना स्थगिती दिल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. यामुळे पुढल्या आठवड्यात होऊ घातलेली पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षापद्धतीमध्ये असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज माहिती तंत्रज्ञान विभागाची बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. त्रुटी दूर करुन पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईन घेण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
महापरीक्षा पोर्टलबाबत अनेक तक्रारी या मुख्यमंत्री कार्यालयाला मिळत आहेत. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बोलावण्यात आली होती. यावेळी राज्य शासनाच्या विविध विभागांतील भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षापद्धतीबाबतच्या तक्रारींबाबत आठवडाभरात बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. यातील त्रुटी दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. यामुळे पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन पर्यवेक्षक आणि परिचर पदांसाठीची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.'