स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : तुर्भे रेल्वे स्टेशनवर एका तरूणीचा भरदिवसा विनयभंग करण्यात आलाय... या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना समोरही आली आणि आरोपीला तत्काळ अटकही होऊ शकली.
वाशी-ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावरील तुर्भे स्थानक... मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता प्लॅटफॉर्म क्र. ३ वर एक २१ वर्षीय तरूणी ठाणे लोकल पकडण्यासाठी जात होती. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ४३ वर्षीय नरेश जोशी नावाच्या नराधमानं तिला पाठीमागून पकडलं. भर रेल्वे स्थानकात तिचं चुंबन घेण्याचा प्रयत्न या नराधमानं केला. त्या तरूणीनं सगळा जोर लावून प्रतिकार करत त्याला ढकलून दिलं. तसंच मदतीसाठी आरडाओरडाही केला.
रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही मॉनिटरींग करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यानं हा सगळा प्रकार पाहिला. त्यानं तत्काळ तरूणीच्या मदतीसाठी आरपीएफ कर्मचाऱ्यांना सतर्क केलं... आणि आरपीएफनं या नराधमाला अटक केली. नरेश जोशीला कोर्टात हजर केलं असता त्याला आठ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. २०१७ मध्ये या रेल्वे मार्गावर महिलांच्या विनयभंगाच्या चार घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
अशा प्रकारच्या वाढत्या घटनांमुळं महिला वर्गात भीतीचं वातावरण आहे. धक्कादायक बाब म्हणजे तुर्भ्यातली घटना घडली तेव्हा अनेक प्रवासी आजुबाजूला उपस्थित होते. पण त्यापैकी कुणीही त्या तरूणीची मदत केली नाही.
यानिमित्तानं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय... अशा नराधमांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे. त्याशिवाय असे प्रकार थांबणार नाही...